विराट कोहलीला धक्का! शुबमन गिल ऑरेंज कॅपच्या शर्यतीत अव्वल, प्रसिद्ध कृष्णा पर्पल कॅपवर ठाम
गुजरात टायटन्सने आयपीएल 2026 मधील एका रोमांचक सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सवर 5 विकेटने विजय मिळवत दमदार कामगिरी केली आहे. केकेआरने दिलेलं 180 धावांचं लक्ष्य टायटन्सने 19.4 षटकांत 5 विकेट गमावत पूर्ण केलं.
कर्णधार शुबमन गिलने पुन्हा एकदा जबरदस्त फॉर्म दाखवत 50 चेंडूत 86 धावांची तुफानी खेळी केली. त्याने 8 चौकार आणि 4 षटकार ठोकत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. या खेळीनंतर गिलने हंगामातील सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराट कोहलीला मागे टाकत अव्वल स्थान पटकावलं आहे.
गिलच्या नावावर आता 4 सामन्यांत 251 धावा झाल्या असून विराट कोहलीने 5 सामन्यांत 228 धावा केल्या आहेत. शुबमन गिल सध्या ऑरेंज कॅप होल्डर आहे. यांच्याशिवाय हेनरिक क्लासेन (224), रजत पाटीदार (222), इशान किशन (213) आणि प्रभसिमरन सिंग (211) हेही शर्यतीत आहेत.
गोलंदाजीत गुजरातच्या प्रसिद्ध कृष्णाने पर्पल कॅपवर आपला दबदबा कायम ठेवला आहे. त्याने 5 सामन्यांत 11 विकेट्स घेतल्या असून केकेआरविरुद्धच्या सामन्यात 4 षटकांत 32 धावा देत 1 विकेट घेतली. त्याच्या पाठोपाठ चेन्नईचा अंशुल कंबोज (10 विकेट्स), लखनऊचा प्रिन्स यादव (9 विकेट्स), रवि बिश्नोई (9 विकेट्स) आणि जोफ्रा आर्चर (7 विकेट्स) यांचा समावेश आहे.
दरम्यान, अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील कोलकाता नाइट रायडर्सला अद्याप हंगामातील पहिल्या विजयाची प्रतीक्षा आहे. केकेआरसाठी हा हंगाम निराशाजनक राहिला आहे. दुसरीकडे शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सने 5 पैकी 3 सामने जिंकत 6 गुणांसह गुणतालिकेत चौथ्या स्थानावर झेप घेतली आहे.
Comments are closed.