IPL 2026 – मुंबईसाठी गुड न्यूज; रोहित लवकरच परतणार
वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्सला पंजाबकडून पुन्हा एकदा निराशाजनक पराभव पत्करावा लागला आणि सलग चौथ्या पराभवाने त्यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहे. मात्र या पराभवाइतकीच चिंता निर्माण करणारी गोष्ट म्हणजे संघाचा प्रमुख फलंदाज रोहित शर्मा दुखापतीमुळे मैदानाबाहेर होता. सामन्यापूर्वी कर्णधार हार्दिक पंडयाने रोहित काही सामने खेळू शकणार नाही, असे संकेत दिल्याने चाहत्यांची धडधड वाढली होती. मात्र आता मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धने यांनी रोहितची दुखापत किरकोळ असून तो लवकरच संघात परतेल, अशी माहिती देत मुंबईसह चाहत्यांनाही मोठा दिलासा मिळाला आहे.
जयवर्धने यांनी पराभवानंतर स्पष्ट केले की रोहितची दुखापत गंभीर नाही. तो सरावाला सुरुवात करत असून धावणे आणि फलंदाजीही करत आहे. मात्र स्पर्धेचा प्रारंभिक टप्पा असल्यामुळे कोणतीही घाई न करता त्याला पूर्णपणे तंदुरुस्त झाल्यानंतरच मैदानात उतरवण्याचा संघ व्यवस्थापनाचा विचार आहे. त्यामुळे रोहितची लवकरच पुनरागमनाची शक्यता नाकारता येत नाही. ही बाब मुंबईसाठी अत्यंत महत्त्वाची आहे, कारण संघाचा कणा असलेला हा अनुभवी फलंदाज लवकर परतणे गरजेचे आहे.
दरम्यान, सामन्याकडे वळल्यास मुंबईने दिलेले 196 धावांचे आव्हान पंजाबने अत्यंत सहज पार केले. प्रभसिमरन सिंगने 39 चेंडूत 80 धावांची नाबाद खेळी करत मुंबईच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. त्याला कर्णधार श्रेयस अय्यरने 35 चेंडूत 66 धावांची जोरदार साथ दिली. दोघांनी तिसर्या गडयासाठी 139 धावांची भागीदारी रचत सामना एकतर्फी केला. पंजाबने केवळ 16.3 षटकांत 3 गडी गमावत लक्ष्य गाठले आणि गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले. या पराभवामुळे मुंबईची स्थिती आणखी बिकट झाली असली, तरी सर्वांचे लक्ष आता रोहितच्या पुनरागमनाकडे लागले आहे. त्याची उपस्थिती संघाला नवसंजीवनी देऊ शकते. सध्या एकच प्रश्न सर्वांच्या मनात आहे रोहित मैदानावर कधी परतणार?
Comments are closed.