इराणच्या नौदलाने भारतीय तेल टँकरवर गोळीबार केला

परराष्ट्र मंत्रालयाकडून राजदुताकडे विचारणा

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

इराणी नौदलाने होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये ओमानजवळ एका भारतीय तेलवाहू जहाजावर गोळीबार केल्याचा प्रकार उघड झाला आहे. ‘जग अर्णव’ नावाचे हे जहाज अंदाजे 20 लाख बॅरल इराकी तेल घेऊन येत असताना हा प्रकार घडला. यासंबंधी भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने शनिवारी इराणी राजदूतांना बोलावून जाब विचारत पूर्ण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. भारतीय नौदल या प्रकरणाची सखोल माहिती गोळा करत आहे. भारताने ही घटना गांभीर्याने घेतली आहे. भारत या मार्गावर अवलंबून असलेल्या प्रमुख देशांपैकी एक असल्याने तेथील वाढत्या तणावाचा परिणाम ऊर्जा पुरवठ्यावर होऊ शकतो.

होर्मुझची सामुद्रधुनी खुली केल्याची घोषणा इराणने केल्यानंतर येथून होणारी व्यापारी जहाजांची वाहतूक पूर्ववत होईल अशी अपेक्षा होती. मात्र, येथील वातावरण अद्यापही तणावपूर्ण असल्याचेच दिसून येत आहे. ‘जग अर्णव’ आणि ‘सनमार हेराल्ड’ ही दोन भारतीय जहाजे मार्गक्रमण करत असताना गोळीबाराची घटना घडली. प्राथमिक वृत्तानुसार, ‘जग अर्णव’वर गोळीबार करण्यात आला, तर दुसरे जहाज सुरक्षित राहिल्याची माहिती देण्यात आली. सुरुवातीला दोन भारतीय जहाजांना होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतावे लागल्याचे वृत्त समोर आले होते. याच काळात गोळीबाराची ही घटना घडली. सध्या होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये एकही भारतीय युद्धनौका तैनात नसली तरी, ओमानच्या आखातात भारतीय युद्धनौका आहेत.

इराणी राजदूतांसोबत बैठक

भारतीय जहाजावर गोळीबाराचे प्रकरण समोर आल्यानंतर इराणी राजदूत सायंकाळी 6:30 वाजता परराष्ट्र मंत्रालयाच्या कार्यालयात पोहोचले. ताज्या माहितीनुसार, इराणी राजदूत आणि भारतीय परराष्ट्र मंत्रालय यांच्यातील बैठक 15 ते 20 मिनिटे चालली. परराष्ट्र मंत्रालयाने आपला तीव्र आक्षेप व्यक्त करत भारतीय जहाजावर गोळीबार कसा करण्यात आला, अशी विचारणा केली. बैठकीनंतर एक व्हिडिओ समोर आला असून त्यामध्ये भारतातील इराणचे राजदूत डॉ. मोहम्मद फताहली परराष्ट्र मंत्रालयातून बाहेर पडताना दिसत आहेत.

या घटनेबद्दल माहिती देताना, इराणच्या आयआरजीसी नौदलाने सांगितले की, व्हीएलसीसी सुपरटँकर ‘सनमार हेराल्ड’सह दोन भारतीय जहाजांना आज होर्मुझच्या सामुद्रधुनीतून पश्चिमेकडे वळण्यास भाग पाडले गेले. ही जहाजे इराकी कच्च्या तेलाचे 20 लाख बॅरल घेऊन जात होती. हल्ल्याचे कारण अद्याप कळलेले नाही. इराणी दूतावासाने बैठकीसंदर्भात भाष्य करण्यास किंवा कोणतेही निवेदन जारी करण्यास नकार दिला आहे.

Comments are closed.