अजित आगरकरांचा करार वाढवला! टीम इंडियाचे मुख्य निवडकर्ता म्हणून किती काळ कायम राहणार? घ्या जाणून

भारताच्या वरिष्ठ निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांचा कार्यकाळ येत्या जून महिन्यात संपत आहे, अशातच त्यांना एका वर्षाची मूदतवाढ मिळणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) पुढील वर्षी होणाऱ्या वनडे विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर आगरकरांना त्यांच्या पदावर कायम ठेवण्याचे वृत्त समोर येत आहे.

आगरकर यांच्या कार्यकाळात भारतीय वरिष्ठ पुरुष संघाने लक्षवेधी कामगिरी केली आहे. संघाने आयसीसी विजेतेपदांचा दुष्काळ संपवला. भारताने त्यांच्या कार्यकाळात २०२३ विश्वचषकाची अंतिम फेरी गाठली. तसेच २०२४ आणि २०२६ मध्ये आयसीसी टी२० विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले. त्याचबरोबर २०२५ मध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून त्यामध्ये भर घातली. यावरून संघाच्या निवडचे चित्र आणखी मजबूत झालेले दिसते.

“आगरकर यांच्या कार्यकाळात संघात कोणताही अडथळा न येता बदल झाले. त्यांनी अनेक धाडसी निर्णय घेतले. असेच काम त्यांनी पुढे करत राहावे असे, बोर्डाला वाटते. बीसीसीआयचे अधिकारी त्यांना माहिती देण्यासाठी आयपीएल सामन्यांवेळी त्याच्यांशी बोलतील”, असे एका बीसीसीआय अधिकाऱ्याने इंडियन एक्सप्रेसला सांगितले आहे.

आगरकर यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीने या वर्षाच्या सुरूवातीला भारतात झालेल्या टी२० विश्वचषकासाठी ईशान किशनला संघात परत घेण्याचा आणि शुबमन गिलला वगळण्याचा निर्णय घेतला होता, जो स्पर्धेत संघासाठी उत्तम ठरला. तसेच बीसीसीआयच्या पॅनेलमध्ये सातत्य आणि अनुभव हवा आहे. आरपी सिंग आणि प्रज्ञान ओझा या दोन निवडकर्त्यांना त्यांच्या पदावर एक वर्षही पूर्ण झाले नाही. आणि २०२७ मध्ये वनडे विश्वचषक असल्याने एका अनुभवी अध्यक्षांना कायम ठेवणे हा निर्णय योग्य ठरतो.

आगरकरांनी त्यांच्या महत्वपूर्ण निर्णायांचे जाहीरपणे समर्थन केले आहे. २०२६ च्या टी२० विश्वचषकाआधी त्यांना एका निवडबाबत विचारले असता ते म्हणाले, “वरच्या फळीत दोन विकेटकीपर (संजू सॅमसन आणि किशन) असा आमचा प्रयत्न आहे आणि संघव्यवस्थापक ठरवेल त्यांना कसा संघ हवा आहे. रिंकू सिंग संघात आल्याने संघाच्या मधल्या फळीत अधिक खोली मिळाली. अशी संघरचना करताना कोणालातरी बाहेर बसावेच लागेल, सध्या तरी गिलला बाहेर बसावे लागत आहे.”

आगरकरांच्या कार्यकाळात भारताने कसोटी, वनडे आणि टी२० अशा तिन्ही प्रकारांमध्ये बदल अनुभवले, रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी कसोटी, टी२० मधून निवृत्ती घेतली. तसेच आर अश्विन याने तिन्ही प्रकारांमधून निवृत्ती घेतली आहे. विराट आणि रोहित भारतासाठी आता केवळ वनडे सामने खेळत असले तरी, ते २०२७ च्या वनडे विश्वचषकात खेळणार की नाही, हा एक महत्वाचा प्रश्न आहे.

Comments are closed.