लातूर हादरले, दोन अल्पवयीन चुलत भाऊ बेपत्ता, एकाचा मृतदेह सापडला, दुसऱ्याचा शोध सुरू
लातूर : चाकूर तालुक्यात घडलेल्या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. स्वामी कुटुंबातील दोन चुलत भाऊ रविवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घरातून बेपत्ता झाले. यापैकी सहा वर्षीय देवांशचा मृतदेह सापडला आहे. तर 11 वर्षीय साईचरण हा अद्याप बेपत्ता आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
दोन्ही मुलं गायब झाल्यानंतर त्यांचा सर्वत्र शोध घेण्यात येत होता. कुटुंबीयांनी तातडीने चाकूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. गावात आणि परिसरात शोधमोहीम सुरू असतानाच काही तासांनी धक्कादायक घटना उघडकीस आली. सहा वर्षीय देवांश मंगेश स्वामी हा घरापासून अवघ्या सुमारे 60 फुटांवर मृत अवस्थेत आढळून आला. ही माहिती मिळताच कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली.
दुसरा मुलगा बेपत्ता
11 वर्षीय साईचरण दिनेश स्वामी हा मुलगा अद्याप बेपत्ता असून त्याचा शोध सुरू आहे. ही मुले नेमकी कशामुळे बेपत्ता झाली, सहा वर्षीय मुलाचा मृत्यू अपघाती आहे की घातपात, तसेच दुसरा मुलगा नेमका कुठे आहे, या सर्व बाबींविषयी अनेक प्रश्न अद्याप अनुत्तरित आहेत. पोलीस तपासानंतरच या घटनेमागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
मृतदेह चाकूर येथील ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. घटनेची माहिती पसरताच नातेवाईक आणि गावकऱ्यांनी रुग्णालयासमोर मोठी गर्दी केली होती.
तपासासाठी दहा पथके तयार
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन लातूर जिल्ह्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह फॉरेन्सिक टीम, फिंगरप्रिंट टीम, डॉग स्क्वॉड आणि स्थानिक गुन्हे शाखेची (एलसीबी) पथके घटनास्थळी दाखल झाली आहेत. बेपत्ता असलेल्या दुसऱ्या मुलाचा शोध घेण्यासाठी तसेच लहान मुलाच्या मृत्यूचा तपास करण्यासाठी स्वतंत्र पथके तयार करण्यात आली आहेत.
याबाबत माहिती देताना पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी सांगितले की, “घटनेचे गांभीर्य लक्षात घेताच अतिरिक्त पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेसह लातूर आणि अहमदपूर येथील पोलिसांची पथके चाकूर येथे दाखल झाली आहेत. जवळपास दहा पथके तयार करण्यात आली असून आरोपीचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. त्याचबरोबर बेपत्ता असलेल्या मुलाबाबत माहिती गोळा करून त्याचा शोध घेण्यावर विशेष भर दिला जात आहे.”
ही बातमी वाचा :
आणखी वाचा
Comments are closed.