गोळीबाराचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील!
होर्मुझच्या सामुद्रधुनीतील दोन टँकरवरील हल्ल्यानंतर भारताचा इराणला इशारा
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, तेहरान
होर्मुझच्या सामुद्रधुनीत भारतीय तेल टँकरवरील हल्ल्याप्रकरणी भारताने इराणला कडक संदेश दिला आहे. इराणी नौदलाने ‘जग अर्णव’ आणि ‘सनमार हेराल्ड’ या दोन भारतीय इंधनवाहू जहाजांवर गोळीबार केला. यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी, एका जहाजाच्या केबिनची काच फुटली. अशा कृतींचे परिणाम इराणला भोगावे लागतील, असा इशारा भारताने इराणला दिला आहे. ‘मरीन ट्रॅफिक’नुसार, भारतीय ध्वज असलेले मालवाहू जहाज ‘जग अर्णव’ सौदी अरेबियातील अल जुबैल येथून भारताच्या दिशेने येत होते. तर ‘सनमार हेराल्ड’ हे दुसरे जहाज इराकहून भारताकडे कच्चे तेल घेऊन येत असताना गोळीबार झाला होता.
इराणच्या नौदलाने दोन भारतीय कच्च्या तेलाच्या जहाजांवर केलेल्या गोळीबारात कोणतीही जीवितहानी झाली नाही. भारतीय अधिकाऱ्यांनी रविवारी याला दुजोरा दिला. तथापि, भारतीय अधिकाऱ्यांनी तेहरानला कडक संदेश देत अशा कोणत्याही कृतीचे परिणाम भोगावे लागतील, असे सांगितले. या घटनेबाबत भारतातील इराणी दूतावास आणि इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (आयआरजीसी) यांच्यात मतभेद आहेत. अमेरिका आणि इस्रायलसोबतच्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या सर्व जहाजांवर टोल लावण्याची ‘आयआरजीसी’ची इच्छा आहे, तर भारतीय अधिकारी अशी मागणी स्वीकारण्यास तयार नाहीत.
एकीकडे भारतीय जहाजांवर गोळीबार होत असताना सध्या एक इराणी युद्धनौका ‘इरिस लावान’ ही भारतातील कोची बंदरात आश्रयास आहे. या युद्धनौकेवरील 183 कर्मचाऱ्यांपैकी सुमारे 120 जणांना आधीच मायदेशी परत पाठवण्यात आले आहे, तर काही अत्यावश्यक कर्मचारी जहाजाच्या देखभालीसाठी केरळमधील बंदरात थांबले आहेत. 4 मार्च रोजी श्रीलंकेजवळ अमेरिकेच्या पाणबुडीने इराणच्या ‘इरिस देना’ या दुसऱ्या युद्धनौकेवर हल्ला करून ती बुडवल्यानंतर इराणच्या जहाजाने भारताकडे आश्रय मागितला होता. या घटनेपासून सदर युद्धनौका भारताच्या सागरी क्षेत्रात तळ ठोकून आहे.
इराणच्या राजदूतांना पाचारण
इराणने यापूर्वी अमेरिका आणि इस्रायलसोबत सुरू असलेल्या संघर्षात सामील नसलेल्या देशांच्या जहाजांना लक्ष्य केले जाणार नसल्याचे म्हटले होते. तरीही भारतीय जहाजावर गोळीबार झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ताज्या घडामोडींनंतर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने तीव्र आक्षेप नोंदवला आहे. नवी दिल्लीने इराणच्या राजदूतांना बोलावून या घटनेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. भारताने ही घटना गांभीर्याने घेतली आहे. यासंबंधी भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने शनिवारी इराणी राजदूतांना बोलावून जाब विचारत पूर्ण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. भारतीय नौदल या प्रकरणाची सखोल माहिती गोळा करत आहे.
Comments are closed.