Latur News – पतीच्या अनैतिक संबंधाचा राग निष्पाप चिमुरड्याच्या जीवावर; चाकूरमधील हत्याकांडाचा छडा, चुलतीला अटक

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

लातूर जिल्ह्यातील चाकूर शहरात 19 एप्रिल 2026 रोजी घडलेल्या देवांश मंगेश स्वामी या लहान मुलाच्या खळबळजनक हत्याकांडाचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश आले आहे. आपल्या पतीच्या अनैतिक संबंधाचा राग मनात धरून, संबंधित महिलेला अडकवण्याच्या कुहेतूने चुलतीनेच देवांशचा गळा आवळून खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी अनिता दिनेश स्वामी (वय 34) हिच्या मुसक्या आवळल्या असून, या घटनेने संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी सकाळी 7:07 वाजताच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये देवांशचा चुलत भाऊ साईचरण उर्फ स्वयं हा सायकलवरून जाताना दिसला. हा तपासातील महत्त्वाचा धागा ठरला. पोलिसांनी कुटुंबातील सदस्यांची सखोल चौकशी सुरू केली असता, फिर्यादीची वहिनी अनिता स्वामी हिचे वर्तन संशयास्पद आढळले. घटनेनंतर तिचा मोबाईल बंद असणे आणि चौकशीत तिने विसंगत माहिती दिल्याने पोलिसांचा संशय बळावला. तांत्रिक पुरावे आणि कौशल्यपूर्ण चौकशीनंतर अनिताने आपला गुन्हा कबूल केला. आरोपी अनिताचा पती दिनेश याचे दुसऱ्या एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते. यावरून पती-पत्नीत नेहमी भांडणे होत असत. पतीच्या प्रेयसीला धडा शिकवण्यासाठी आणि तिला कायदेशीर कचाट्यात अडकवण्यासाठी अनिताने एक भयानक कट रचला. स्वतःच्या मुलाच्या आणि दिराच्या मुलाच्या (देवांश) अपहरणाचा बनाव करून तिने देवांशची हत्या केली. या हत्येचा आळ पतीच्या प्रेयसीवर येईल, असा तिचा कयास होता. हत्या केल्यानंतर तिने पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने देवांशचा मृतदेह शेजारील एका पडक्या वाड्यात फेकून दिला होता.

घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी स्वतः घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या होत्या. अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि चाकूर पोलिसांची पाच पथके तैनात करण्यात आली होती. सीसीटीव्ही विश्लेषण, तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे केवळ काही तासांतच या गुन्ह्याचा छडा लावण्यात आला. या प्रकरणी चाकूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १०३(१) आणि २३८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून अनिता स्वामी हिला अटक करण्यात आली आहे. या कारवाईत उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर, पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर, बालाजी भंडे व त्यांच्या पथकाने मोलाची कामगिरी बजावली. या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा अधिक तपास पोलीस करत आहेत. या घटनेमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण असले तरी, पोलिसांनी आरोपीला तातडीने अटक केल्याने समाधान व्यक्त होत आहे.

Comments are closed.