शेवटी मुंबईचा स्वाभिमान जागा झाला! विजयासाठी आसुसलेल्या ‘पलटण’ला तिलक वर्माने दिले बळ; बालेकिल्
मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्सचा पराभव केला IPL 2026 : सलग चार पराभवांच्या धक्क्यानंतर सहाव्या सामन्यात मुंबई इंडियन्सने विजयी गर्जना केली. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या आयपीएल 2026 च्या 30 व्या सामन्यात, हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली मुंबईने गुजरात टायटन्सचा 99 धावांनी मोठा पराभव केला. या विजयासह मुंबईने स्पर्धेत आपले अस्तित्व टिकवून ठेवले आहे. तिलकच्या शतकाच्या जोरावर मुंबईने 20 षटकांत 199 धावांचा डोंगर उभा केला. जसप्रीत बुमराह आणि अश्वनी कुमारच्या धारदार स्पेलसमोर गुजरातचा एक पण फलंदाज तग धरू शकला नाही आणि गुजरातचा संपूर्ण संघ अवघ्या 100 धावांवर गारद झाला.
सूर्यकुमार यादव पुन्हा नापास
या सामन्यात, गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सची सुरुवात खराब झाली आणि दानिश 10 धावांवर बाद झाला. त्यानंतर संघाची धावसंख्या 25 असताना डी कॉक बाद झाला. चांगल्या फॉर्ममध्ये असलेला सूर्यकुमार यादव देखील 10 चेंडूंमध्ये 15 धावांवर बाद झाला.
तिलक वर्माचा तांडव 23 चेंडूंमध्ये 82 धावा
44 धावांवर तीन गडी बाद झाले. तिलक वर्माने सूत्रे हाती घेतली आणि एके वेळी फलंदाजी करत 22 चेंडूंमध्ये 19 धावा केल्या. मात्र, त्यानंतर त्याने धुमाकूळ घालत पुढच्याच 23 चेंडूंमध्ये 82 धावा केल्या. एकेवेळी संघाने 14 षटकांत 103 धावा केल्या होत्या, पण तिलक वर्माच्या वादळी खेळीमुळे मुंबईने शेवटच्या सहा षटकांत 98 धावा केल्या. हार्दिक पांड्याचा खराब फॉर्म कमी होण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. हार्दिक 13 व्या षटकात फलंदाजीसाठी आला. तिलक चांगल्या लयीत होता हे समजण्यासारखे आहे, त्यामुळे त्याने जास्त चेंडू खेळले. मात्र, हार्दिकने 16 चेंडू वाया घालवले आणि केवळ 15 धावाच करू शकला.
बुमराह-अश्वनीच्या माऱ्यापुढे गुजरात ढेपाळली
200 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरात टायटन्सची सुरुवातच खराब झाली. जसप्रीत बुमराहने डावाच्या पहिल्याच चेंडूवर साई सुदर्शनला बाद केले. सुदर्शनला आपले खाते उघडता आले नाही. यानंतर, गुजरात टायटन्सचा निम्मा संघ 55 धावांवर सर्वबाद झाला. जोस बटलर (5), शुभमन गिल (14), वॉशिंग्टन सुंदर (26) आणि ग्लेन फिलिप्स (6) हे सर्व बाद झाले. त्यानंतर अश्विनी कुमारने राहुल तेवतियाला 8 धावांवर बाद करून गुजरातला सहावा धक्का दिला. मग, 13 व्या षटकात अश्विनी कुमारने रशीद खान (4) आणि शाहरुख खान (17) यांना बाद करून गुजरात टायटन्सचे कंबरडे मोडले. यासह अश्विनी कुमारने आपले 4 बळी पूर्ण केले आणि गुजरातचा डाव 100 धावांवरच आटोपला.
पॉइंट्स टेबलमध्ये मुंबई इंडियन्स कुठे?
या विजयामुळे पॉइंट्स टेबलमध्ये मुंबई इंडियन्सला मोठा दिलासा मिळाला आहे. 6 सामन्यांत 4 गुणांसह त्यांनी आपली स्थिती सुधारली आहे. थेट 10 व्या स्थानावर सातव्या क्रमांकावर उडी मारली आहे. दुसरीकडे, गुजरात टायटन्सला या पराभवाचा मोठा फटका बसला असून त्यांचे 6 सामन्यांत 6 गुण कायम आहेत. मुंबई इंडियन्सचा हा विजय केवळ दोन गुणांपुरता मर्यादित नाही, तर आत्मविश्वास परत मिळवण्याचा मोठा टर्निंग पॉइंट ठरू शकतो. आगामी सामन्यांत हीच लय कायम ठेवण्याचे आव्हान आता पांड्या आणि त्यांच्या संघासमोर आहे.
आणखी वाचा
Comments are closed.