शिवसेनेकडून बच्चू कडू यांना विधान परिषदेची ऑफर, एकनाथ शिंदेंसोबतच्या बैठकीत नेमकं काय घडलं?
बच्चू कडू: महाराष्ट्र विधान परिषदेच्या 9 जागांसाठी निवडणूक जाहीर (Maharashtra Vidhan Parishad Election 2026) करण्यात आली आहे. विधान परिषदेच्या 9 जागांसाठी नियमित निवडणूक तर एका जागेची पोटनिवडणूक पार पडणार आहे. भारत निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. विधान परिषदेच्या 10 जागांसाठी 12 मे रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षात इच्छुकांची मोठी गर्दी दिसत आहे. अशातच विधानपरिषदेच्या निवडणुकीसंदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि प्रहारचे प्रमुख बच्चू कडू यांची भेट झाली आहे. शिवसेनेकडून बच्चू कडू यांना विधानपरिषदेची ऑफर देण्यात आल्याची माहिती खुद्द बच्चू कडू यांनी दिली आहे.
शिंदे शिवसेनेकडून विधान परिषदेच्या दोन जागा लढवल्या जाणार
एकनाथ शिंदे आणि बच्चू कडू यांची दोन दिवसांपूर्वी मुंबईत भेट झाली होती. विधान परिषदेच्या जागे संदर्भात एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा झाल्याची माहिती बच्चू कडू यांची एबीपी माझाला दिली आहे. शिंदे शिवसेनेकडून विधान परिषदेच्या दोन जागा लढवल्या जाणार आहेत. त्यातील एका जागे संदर्भात शिवसेनेकडून आपल्याला ऑफर असल्याची माहिती बच्चू कडू यांची एबीपी माझाला दिली आहे.
विधान परिषदेतील 9 आमदारांचा कार्यकाळ संपणार
1. उद्धव ठाकरे (शिवसेना – उबाठा)
2. नीलम गोऱ्हे (शिवसेना)
3. शशिकांत शिंदे (राष्ट्रवादी – शरद पवार गट)
4. अमोल मिटकरी (राष्ट्रवादी – अजित पवार गट)
5. गोपीचंद पडळकर (भाजप)
6. रणजितसिंह मोहिते-पाटील (भाजप)
7. राजेश राठोड (काँग्रेस)
8. प्रवीण दटके (भाजप)
9. रमेश कराड (भाजप)
28 मतांचा कोटा आवश्यक
दरम्यान, विधान परिषदेचा एक आमदार निवडून येण्यासाठी 28 मतांचा कोटा आवश्यक आहे. महायुतीत भाजप (131 आमदार), एकनाथ शिंदे यांची शिवसेना (57 आमदार) आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी (40 आमदार) असे बलाबल पाहता महायुतीचे 8 उमेदवार सहज निवडून येऊ शकतात. तर महाविकास आघाडीचे एकूण संख्याबळ 46 आहे. त्यामुळे त्यांचा केवळ एकच उमेदवार सहज निवडून येऊ शकतो. दुसऱ्या जागेसाठी त्यांना 10 मतांची जुळवाजुळव करावी लागेल, जे सध्याच्या स्थितीत कठीण दिसत आहे.
विधान परिषदेच्या निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम- (Maharashtra Vidhan Parishad Election 2026)
निवडणुकीची अधिसूचना जारी करणे : 23 एप्रिल, 2026
उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस: 30 एप्रिल 2026
उमेदवारी अर्जांची छाननी: 2 मे 2026
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख: 4 मे 2026
मतदानाची तारीख: 12 मे 2026
मतदानाची वेळ: सकाळी 9 वाजेपासून ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत आहे.
मतमोजणी: 12 मे 2026 संध्याकाळी 5 वाजता
निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम तारीख: 13 मे 2026
आणखी वाचा
Comments are closed.