डोंबिवलीजवळ लोकल घसरली! ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वे बोंबलली
डोंबिवली स्थानकातून कल्याणच्या दिशेने जाणारी रिकामी लोकल आज सकाळी साडेआठच्या सुमारास घसरली. या लोकलमध्ये कोणीही प्रवाशी नसल्याने मोठी दुर्घटना टळली. मात्र त्याचा परिणाम मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर झाला आणि ऐन गर्दीच्या वेळी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी चाकरमानी लटकले. लोकलची घसरगुंडी होत मध्य रेल्वेची ऐशी की तैशी झाल्याने कामावर जाणाऱ्या प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. पावणेतीन तासांनंतर रेल्वेची सेवा रुळावर आली.
ट्रकमधून प्रवाशांची पायपीट
सकाळच्या वेळेस डोंबिवलीतील सर्वच फलाटांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी असते. मस्टर गाठण्यासाठी डोंबिवलीकरांना लोकलमध्ये चढताना रोजच तारेवरची कसरत करावी लागते. त्यात लोकल घसरल्याने अन्य गाड्या पंधरा ते वीस मिनिटे उशिराने धावत होत्या. तर डाऊन स्लो मार्गावरील वाहतूक पूर्ण ठप्प झाली. त्यामुळे प्रवाशांना रुळावरून पायपीट करावी लागली.
पावणेतीन तासांनंतर सेवा रुळावर
फलाट क्रमांक 1वरून कल्याणच्या दिशेने डाऊन स्लो मार्गावर लोकल जात होती. त्याच वेळी शेवटून तिसरा डबा रुळावरून अचानक घसरला. लोकल घसरल्याचे समजताच मध्य रेल्वेचे 60 कर्मचारी व अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी दुरुस्तीचे काम पूर्ण केले. सुमारे पावणेतीन तासांनंतर मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा सुरू झाली.
Comments are closed.