छत्तीसगडमध्ये खासगी विमान कोसळले.
जशपूरमधील डोंगरमाथ्यावर दुर्घटनाग्रस्त : पायलट, को-पायलट यांचा मृत्यू
वृत्तसंस्था/ जशपूर
छत्तीसगडच्या जशपूर जिह्यात सोमवारी एका खासगी चार्टर्ड विमानाला अपघात झाला. प्राथमिक माहितीनुसार, आरा टेकड्यांमध्ये एक खासगी विमान कोसळल्याचे सांगण्यात आले. जशपूरच्या नारायणपूर भागातील रतनपहळी जंगलात चार्टर्ड विमान झाडांना धडकल्यानंतर दुर्घटनाग्रस्त झाले. अपघातानंतर प्रशासनाने केलेल्या प्राथमिक तपासात पायलट आणि को-पायलट या दोघांचाही मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. विमानात इतर कोणी प्रवासी होते का, याचा तपास अद्याप सुरू आहे.
डोंगराळ भागात विमान कोसळताच त्याला आग लागली व त्यानंतर काळ्या धुराचे लोट आकाशात पसरल्याचे दिसून येत होते. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासकीय पथके घटनास्थळी दाखल झाली. घटनास्थळावरील फोटो आणि व्हिडिओमध्ये विमानाचा जळणारा ढिगारा दिसत आहे. विमान खूप कमी उंचीवर उडत असल्यामुळे अचानक नियंत्रण सुटून ही दुर्घटना घडल्याचा दावा प्रथमदर्शनी केला जात आहे. तसेच खराब हवामानामुळे ते थेट आरा टेकडीवरील झाडीमध्ये कोसळले असावे असेही सांगितले जात आहे.
बचावकार्यात आव्हाने
अपघाताची माहिती मिळताच, एसएसपी लाल उमेद सिंग यांच्यासह वरिष्ठ जिल्हा अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. हा अपघात घनदाट जंगल आणि डोंगराळ भागात झाल्यामुळे बचाव पथकांना ढिगारा असलेल्या ठिकाणी पोहोचण्यात आणि मृतदेह बाहेर काढण्यात मोठ्या अडचणी येत होत्या. स्थानिक पोलीस आणि प्रशासकीय पथके सतत मदतकार्यात गुंतलेली होती. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी प्रशासन आता विमानाची मालकी आणि त्याच्या उ•ाण मार्गाविषयी तांत्रिक माहिती गोळा करत आहे.
Comments are closed.