उधमपूरमध्ये भीषण बस अपघात

21 प्रवाशांचा मृत्यू, अनेकजण गंभीर जखमी

वृत्तसंस्था / उधमपूर (जम्मू काश्मीर)

जम्मू-काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यातील कानोटे खेड्यानजीक महामार्गावर भीषण बस अपघात घडला असून त्यात किमान 21 प्रवाशांचा बळी गेला आहे. अनेक जण जखमी असून त्यांच्यातील काहींची प्रकृती गंभीर आहे. जखमींवर उधमपूर शहरातील रुग्णालयांमध्ये उपचार करण्यात येत आहेत. ही दुर्घटना सोमवारी सकाळी घडली. हे वृत्त कळताच प्रशासनाने त्वरित निवारण कार्याला प्रारंभ केला. ही बस रामनगर येथून उधमपूर येथे चालली असताना हा अपघात झाला आहे.

उधमपूर भागातील ज्येष्ठ प्रशासकीय अधिकारी आणि डीआयजी अपघात स्थळी त्वरित पोहचले. जखमींना अपघात स्थळापासून उधमपूरच्या प्रशासकीय रुग्णालयात नेण्यात आले. बसचालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला, असे प्रथमदर्शनी दिसून आले आहे. चौकशीचा आदेश देण्यात आला असून चौकशी अहवाल समोर आल्यानंतरच अपघाताच्या खऱ्या कारणांची माहिती मिळणार आहे. हा घातपाताचा प्रकार नसल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाल्याची माहिती देण्यात आली. मात्र, सर्व शक्यता गृहित धरुन तपासणी करण्याची सूचना देण्यात आली आहे. निवारण कार्य त्वरित हाती घेण्यात आल्याने अनेक जखमी प्रवाशांचे प्राण वाचण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र, अनेक प्रवाशांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांची संख्या आणखी वाढण्याची चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

केंद्रीय मंत्र्यांनी घेतली माहिती

केंद्रीय मंत्री जीतेंद्र सिंग यांनी यांनी या अपघातासंबंधी दु:ख व्यक्त केले असून उधमपूरचे जिल्हाधिकारी मिंगा सिंग यांच्याकडून या अपघाताची माहिती घेतली. त्यांनी आपदा निवारण कार्याचाही आढावा घेतला. जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी या अपघातासंबंधी शोक व्यक्त केला आहे. जखमींना प्रशासनाकडून शक्य ते सर्व साहाय्य देण्यात येईल. शासकीय खर्चाने त्यांच्यावर उपचार करण्यात येतील. प्रत्येक मृतामागे हानी भरपाईही देण्यात येईल, अशी घोषणा त्यांनी केली. केंद्र सरकारनेही अपघातग्रस्तांना शक्य ते सर्व साहाय्य करण्यास प्रारंभ केला आहे. अपघातग्रस्त बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्याच्या कामात स्थानिक प्रशासनानेही महत्वाचे योगदान केल्याचे दिसून आले.

Comments are closed.