सत्ताधारी नेत्यांच्या एजन्सीकडून मुंबई गोवा महामार्गावर टोल वसुलीच्या अनुषंगाने सर्वेक्षण – वैभव नाईक
नारायण राणेंच्या वाढदिवसाच्या औचित्यावर केंद्रीय नितीन गडकरी हे सिंधुदुर्गात आले होते. मात्र त्यांचा सिंधुदुर्ग दौरा हा ओसरगाव टोल नाका सुरू करण्यासाठीच होता अशी चर्चा सध्या कोकणात सुरू आहे. गडकरी यांच्या सिंधुदुर्ग दौऱ्यानंतर टोल सुरू करण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. दरम्यान सत्ताधारी नेत्यांच्या एजन्सीकडून टोल वसुलीच्या अनुषंगाने सर्वेक्षण देखील गेले काही दिवस सुरू असल्याचा आरोप माजी आमदार वैभव नाईक यांनी केला. मात्र, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा कोकणातील टोल वसुलीला तीव्र विरोध असेल असा इशारा त्यांनी दिला.
कणकवली येथील विजय भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना नितीन गडकरी यांनी महामार्ग अपूर्ण राहिल्याबद्दल माफी मागितली आणि मे अखेरपर्यंत काम पूर्ण करण्याची ग्वाही देखील दिली. ही आश्वासने गडकरी देत असताना दुसऱ्या बाजूने टोल नाका सुरू करण्यासाठीही कार्यवाही सुरू करण्यात आली.
१७ एप्रिल रोजी टोल नाका सुरू करण्याच्या अनुषंगाने निविदा मागविण्यात आल्या. आता २४ एप्रिल रोजी या निविदा उघडल्या जाऊन ठेकेदार निश्चित होणार आहेत, असा आरोप वैभव नाईक यांनी केला.
नाईक म्हणाले, मुंबई गोवा महामार्ग पूर्ण झाल्याखेरीज ओसरगाव टोल नाका सुरू करू नका अशी आमची ठाम भूमिका आहे. महामार्ग पूर्ण होण्यासाठी अजून एक ते दीड वर्षाचा कालावधी जाणार आहे. तोपर्यंत टोल सुरू होता कामा नये. त्यासाठी आम्ही पुन्हा आंदोलन उभारणार आहोत. या आंदोलनाला व्यापारीसंघासह सर्व जनतेने पाठिंबा द्यायला हवा. टोल ठेका घेणारी कंपनी ही सत्ताधारी नेत्यांची आहे. त्यामुळे टोल विरोधी आंदोलन पोलीस दलाच्या बळावर मोडून काढण्याचा प्रयत्न होईल. मात्र आमचा टोल सुरू करण्याला तीव्र विरोध असणार आहे.
Comments are closed.