लोटे औद्योगिक वसाहतीत पिण्याच्या पाण्यातून केमिकल मिश्रित पाण्याचा पुरवठा; ग्रामस्थांना विषबाधा

खेड तालुक्यातील पिरलोटे येथील दत्तवाडी, विठ्ठलवाडी आणि गावठाणवाडी येथील नळांना रासायनिक सांडपाणी मिश्रित पिवळ्या रंगाचे पाणी आल्यामुळे ग्रामस्थांचा संताप अनावर झाला. ही घटना काल बुधवारी सकाळी सात ते नऊ वाजण्याच्या दरम्यान घडली. या घटनेला सुप्रिया लाईफ सायन्सेसचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचा आरोप करण्यात येत असून या रासायनिक पाण्यामुळे लोटे परिसरातील ग्रामस्थांना विषबाधा झाल्याचे आढळून येत असल्याने लोटे औद्योगिक वसाहतीत एकाच खळबळ उडाली आहे.

या धक्कादायक घटनेनंतर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. नागरी वस्तीत पाणीपुरवठा करणारी स्वतंत्र जलवाहिनी जोडून द्यावी, त्यावर कोणत्याही कारखान्याचे कनेक्शन नसावे, अशी मागणी संतप्त ग्रामस्थांमधून केली जात आहे. याप्रसंगी लोटे परशुराम उद्योजक संघटनेचे अध्यक्ष ॲड.राज आंब्रे आणि रत्नागिरी जिल्हा फेडरेशन ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष डॉ.प्रशांत पटवर्धन उपस्थित होते.

लोटे परिसरातील बहुतांश गावांना एमआयडीसी कडून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो. मात्र पुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या अनेक ठिकाणी फुटलेल्या असून त्यामध्ये अनेकदा रासायनिक सांडपाणी किंवा पावसाचे पाणी मिसळते. अशीच घटना बुधवारी २२ एप्रिल रोजी सकाळी घडली. पिरलोटेमधील दत्तवाडी, विठ्ठलवाडी आणि गावठाणवाडी येथील नळांना हे रासायनिक सांडपाणी मिश्रित पाणी आले. पाण्याचा रंग पिवळा होता. काही ग्रामस्थांनी आणि लहान मुलांनी नकळत हे पाणी प्यायले. मात्र त्यांना उग्र आणि विचित्र वास आल्यामुळे तात्काळ इतरांना सांगितले. ही घटना समजतात गावातील ग्रामस्थ महेश गोवळकर ,उदय चाळके, संजय चाळके, सचिन चाळके, मंगेश चाळके, रवींद्र गोवळकर,सरपंच चंद्रकांत चाळके आणि इतरही अनेक ग्रामस्थ पिरलोटे येथील एमआयडीसीच्या कार्यालयात धडकले. मात्र सकाळी आठची वेळ असल्यामुळे येथे कोणीही अधिकारी उपस्थित नव्हते.

या दरम्यान ज्या ग्रामस्थांनी हे रसायन मिश्रित पाणी प्यायले होते त्यांपैकी सुमारे दहा ते बारा ग्रामस्थांना त्रास झाल्यामुळे पीरलोटे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल झाले. तात्काळ या ग्रामस्थांनी एमआयडीसीची अधिकारी हळदणकर तसेच एम. पी. सी. बी. चे अधिकारी श्रीपाद कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधून त्यांना बोलावून घेतले आणि परिस्थितीची माहिती दिली. हे रासायनिक सांडपाणी हे सुप्रिया लाइफ सायन्स या कारखान्याचेच आहे, असा आरोप या ग्रामस्थांनी केला आणि कारखान्याच्या व्यवस्थापनातील अधिकाऱ्यांनाही घटनास्थळी बोलावून घेत याबाबत जाब विचारला.

कारखान्याच्या अधिकाऱ्यांनी ‘ते रासायनिक सांडपाणी आमच्या कारखान्याचेच आहे, असे कबूल केले. मात्र सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पामध्ये जाणारी वाहिनी गेले तीन-चार महिने चोकअप असून त्याबाबत आम्ही वारंवार एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना कळविले आहे व ती दुरुस्त करण्याची विनंती केली आहे. सांडपाणी वाहून नेणारी वाहिनी चोकअप झाल्यामुळेच चेंबर ओव्हरफ्लो झाला आणि त्याचे पाणी पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन मध्ये मिसळले, असे सांगण्यात आले. या तीन वाड्यांकडे जाणारी एमआयडीसी ने दिलेली पिण्याच्या पाण्याची जलवाहिनी सुद्धा गेले कित्येक दिवस फुटलेली असून त्यातून पाणी वाया जात असते आणि जेव्हा पाणीपुरवठा बंद असतो तेव्हा बाहेरील पाणी या पाईपलाईन मध्ये मिसळले जाते,असेही कारखाना व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले. तरीही सामुदायिक सांडपाणी प्रकल्पामध्ये तुमचे सांडपाणी सोडत असाल, तर त्याला सुद्धा काही मापदंड आहेत.हे ओव्हरफ्लो झालेले सांडपाणी या मापदंडांना अनुसरून आहे की नाही,याची तपासणी प्रदूषण नियंत्रण महामंडळाने करून या कारखान्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी संतप्त ग्रामस्थांनी केली आहे.

Comments are closed.