संतोष देशमुख हत्याकांड प्रकरण, आरोपी विष्णू चाटेचा पॉवर ऑफ अॅटर्नीसाठी अर्ज
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांड प्रकरणाची आज सुनावणी पार पडली. या सुनावणी दरम्यान आरोपी विष्णू चाटे याने आर्थिक व इतर व्यवहारासाठी पॉवर ऑफ अॅटर्नी कोणाला तरी देण्यात यावी असा अर्ज न्यायालयामध्ये सादर केला. या अर्जावर पुढच्या सुनावणीत सरकारी वकील आक्षेप मांडणार आहेत.
स्व.संतोष देशमुख यांच्या निर्घुण हत्येचे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ठ आहे. विशेष मकोका न्यायालयामध्ये आज या प्रकरणाची सुनावणी पार पडली. सुनावणी दरम्यान या प्रकरणातील एक आरोपी विष्णू चाटे याने न्यायालयासमोर एक अर्ज सादर केला. त्यात त्याने असे म्हटले आहे की, आर्थिक व्यवहार आणि इतर व्यवहार ठप्प झाले आहेत. बँकांचे हप्ते थकले आहेत. व्यवहार सुरळीत करण्यासाठी कोणाला तरी मुख्त्यारनामा देण्यात यावा जेणे करून बँक व्यवहार सुरळीत होतील अशी मागणी त्यांनी केली आहे. या अर्जावर पुढच्या सुनावणीत सरकारी वकील आक्षेप घेऊन आपली भूमिका मांडणार आहेत. दरम्यान आजच्या प्रकरणानंतर संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख पत्रकारांशी संवाद साधताना असे म्हणाले की, जो डाटा रिकव्हर झाला आहे तोच आता या प्रकरणात वापरला जाणार आहे. तसे लिहूनही दिले आहे. पण आरोपींच्या वकिलांना वेगळ्या शब्दात म्हणणे हवे आहे. या प्रकरणात प्रत्येक सुनावणीच्या दरम्यान तारीख टाळण्याचा प्रयत्न केला जात आहे. प्रत्येक तारखेला खोडा घातला जात आहे असे त्यांनी म्हटले.
Comments are closed.