इराणने दोन तेल टँकर जप्त केले.

आयआरजीसीने केला दावा, सुटकेसाठी प्रयत्न

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

होमुझची सामुद्रधुनी पार करुन भारताकडे येणाऱ्या एका तेलवाहक नौकेसह दोन नौका इराणच्या नौदलाने ताब्यात घेतल्या आहेत, असा दावा आयआरजीसीने केला आहे. एमएससी फ्रान्सेस्का आणि एपामिनोन्डास अशी या नौकांची नावे आहेत. त्यांच्यापैकी एपामिनोन्डास ही नौका दुबईच्या जाबेल अली बंदरावरुन गुजरातकडे येत होती. मात्र, ती भारताची नौका नाही, असे स्पष्टीकरण करण्यात आले आहे. तसेच या नौकेतील तेलही भारताचे नाही, असे समण्यात येत आहे.

एपामिनोन्डास ही नौका एका ग्रीक कपंनीची आहे. या नौकेवर इराणच्या नौदलाने हल्ला केला होता. या नौकेवर मोठ्या प्रमाणावर गोळीबार करण्यात आल्याने तिची मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे. या दोन नौकांसमवेत इरणने आणखी तीन तेलवाहक नौकांवर हल्ला केला आहे. इराणच्या अनुमतीशिवाय होर्मुझची सामुद्रधुनी पार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रत्येक नौकेवर इराण हल्ला करीत आहे. इराणने रशियाचा ध्वज असणाऱ्या नौकांना मात्र ही सामुद्रधुनी पार करण्याची अनुमती दिली आहे. भारताने आता रशियाकडून तेलखरेदी अधिक प्रमाणात करण्यास प्रारंभ केला आहे. भारतासाठी तेल घेऊन येणाऱ्या रशियाचा नौका होर्मुझ सामुद्रधुनीतूनही येऊ शकतात किंवा त्या आफ्रिकेला वळसा घालूनही येऊ शकतात. इराणने रशियाला अनुमती दिल्याने भारताची काही प्रमाणात सोय होऊ शकणार आहे. भारताने आता पर्यायी इंधन व्यवस्था करण्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. भारत सध्या 41 देशांकडून तेल आणि इंधन वायू विकत घेत आहे.

शस्त्रसंधीचा कालावधी

अमेरिकेने इराणशी होत असलेल्या शस्त्रसंधीचा कालावधी आणखी वाढविला आहे. तो बुधवारी संपणार होता. तथापि, चर्चेद्वारे तोडगा काढण्यास अधिक संधी उपलब्ध व्हावी, यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. इराणने अद्याप पाकिस्तानमध्ये आपले शिष्टमंडळ चर्चा करण्यासाठी पाठविलेले नाही. अमेरिकेनेही आपले शिष्टमंडळ परत बोलाविले आहे. त्यामुळे शांतता चर्चा होईल की नाही, तसेच होणारच असेल, तर केव्हा होईल, याविषयी मोठी अनिश्चितता सध्या आहे.

होर्मुझ बंदच

अमेरिकेने अद्याप होर्मुझ सामुद्रधुनीची बंदी उठविलेलाr नाही. इराणनेही आता हा मार्ग बंद केला आहे. त्यामुळे जागतिक तेलवाहतुकीवर मोठा विपरीत परिणाम होत आहे. भारताचा तेलपुरवठा आतापर्यंत सुरळीत होत असला, तरी लवकर शांतता प्रस्थापित झाली नाही, तर भारतासह दक्षिण आशियातील देशांना त्रास होऊ शकतो, असे तज्ञांचे मत आहे. सध्या भारताकडे पुरेसा तेलसाठा आहे, अशी माहिती आहे. भारताला होणाऱ्या इंधन वायूच्या पुरवठ्यातही आता सुस्थिरता आल्याचे दिसून येते. मात्र, या संघर्षावर त्वरित तोडगा निघणे आवश्यक मानले जात आहे.

Comments are closed.