सेना महासंघाची इंडियन बँक्स असोसिएशनवर धडक; बँक कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न लवकरच सुटणार
बँक कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न आणि विविध कल्याणकारी योजना मार्गी लावण्यासाठी बँक कर्मचारी सेना महासंघ व ऑल इंडिया बँक अधिकारी सेना महासंघाच्या वतीने इंडियन बँक्स असोसिएशन कार्यालयावर धडक दिली. महासंघाचे अध्यक्ष तथा शिवसेना खासदार अनिल देसाई यांच्या अध्यक्षतेखाली पदाधिकाऱ्यांनी आयबीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी अतुल कुमार गोयल यांची भेट घेऊन कर्मचाऱ्यांच्या अडचणी आक्रमकपणे मांडल्या. अखेर असोसिएशनकडून सकारात्मक भूमिका घेत तोडगा काढण्याचे आश्वासन देण्यात आले. त्यामुळे लवकरच बँक कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न सुटणार आहेत.
असोसिएशनसोबत पार पडलेल्या बैठकीत दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली पाच दिवसांच्या आठवड्याची मागणी, रिक्त असलेल्या सब-स्टाफ व लिपिक वर्गाची भरती प्रक्रिया, विसंगतींचा न्यायप्रविष्ट असलेला विषय, ‘लीव्ह बँक’ योजनेची अंमलबजावणी तसेच ‘अनुकंपा तत्त्वावरील भरती धोरण’ असे या विषयांवर चर्चा करण्यात आली. महासंघाने कर्मचाऱ्यांचे विविध मुद्दे इंडियन बँक्स असोसिएशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी अतुल कुमार गोयल यांच्यासमोर आक्रमकपणे मांडले. यावेळी शिवसेना खासदार अनिल देसाई यांच्यासह भारतीय विमा कर्मचारी सेना सरचिटणीस दिनेश बोभाटे, सरचिटणीस विनोद निकम, उपाध्यक्ष राजेश मटकरी, महिला प्रमुख पदाधिकारी अनिशा हिर्लेकर, अभिलाषा आंबरे, एसबीआयचे हेमंत रासम, बीओआयचे श्रीकृष्ण शेवाळे, कॅनरा बँकेचे अतुल तोंडे, पीएनबीचे रोहित यादव, बीओएमचे अनंत सावंत, आयओबीचे भारत जाधव यांच्यासह विविध बँकांचे सरचिटणीस उपस्थित होते.
पाठपुरावा सुरू ठेवणार असल्याचा इशारा
बँक कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावा आणि त्यांना दिलासा द्या. जोपर्यंत कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत पाठपुरावा सुरू ठेवणार असल्याचा इशारा यावेळी बीकेएसएम आणि एआयबीएएसएम महासंघाच्या वतीने सरचिटणीस विनोद निकम यांनी निवेदनाद्वारे असोसिएशनला दिला. दरम्यान, बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्यानंतर गोयल यांनी बँक कर्मचाऱ्यांच्या समस्यांचे निराकरण केले जाईल, असे आश्वासन महासंघाला दिले.
Comments are closed.