मुंबईविरुद्धच्या सामन्यापूर्वी सीएसकेच्या मुकेश चौधरीवर दु:खाचा डोंगर कोसळला, आईचे छत्र हरपले

चेन्नई सुपर किंग्जचा वेगवान गोलंदाज मुकेश चौधरीच्या आईचे निधन झाले आहे. सीएसके (CSK) संघाने गुरुवारी दुपारी आपल्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावर ही माहिती दिली. सीएसकेने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर लिहिले, “सीएसके परिवार मुकेश चौधरी यांच्या आईच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत आहे. या अत्यंत कठीण काळात आम्ही मुकेश आणि त्याच्या कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत; आमच्या प्रार्थना आणि विचारांमध्ये आम्ही त्यांना स्थान देत आहोत.”

2022 मध्ये सीएसकेकडून पदार्पण केल्यापासून मुकेश या संघाचा एक भाग राहिला आहे. त्या हंगामात त्याने 13 सामने खेळले आणि 16 विकेट्स घेतले. त्याचा इकॉनॉमी रेट 9.31 इतका होता. गेल्या तीन वर्षांत, त्याने केवळ आणखी चार सामने खेळले आहेत. आतापर्यंत, त्याने 17 सामन्यांमध्ये 19 विकेट्स घेतले असून, त्याचा इकॉनॉमी रेट 9.96 इतका आहे.

आयपीएळ 2026 मध्ये सीएसकेची कामगिरी संघर्षपूर्ण ठरत आहे. पाच वेळा विजेते ठरलेल्या या संघाने आपल्या मोहिमेची सुरुवात सलग तीन पराभवांनी केली. त्यानंतर त्यांनी दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्याविरुद्ध सलग दोन सामने जिंकले, परंतु आपला शेवटचा सामना सनरायझर्स हैदराबादकडून 10 धावांनी गमावला. ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखालील हा संघ सध्या गुणतालिकेत आठव्या स्थानावर आहे.

आयपीएल 2026 मध्ये सीएसकेचा संघ दुखापतींच्या समस्येचा सामना करत आहे. खलील अहमद आणि आयुष म्हात्रे यांसारखे खेळाडू आयपीएल मधून बाहेर झाले आहेत. माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने अद्याप संघासाठी एकही सामना खेळलेला नाही. दुखापतीमुळे डेवाल्ड ब्रेव्हिसलाही सुरुवातीच्या सामन्यांना मुकावे लागले. मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात धोनी मैदानात उतरेल अशी अपेक्षा होती, मात्र तसे घडताना दिसत नाही. धोनी अद्याप पूर्णपणे तंदुरुस्त नसल्याचे अहवालांवरून समोर येत आहे. तरीही, त्याला सराव करताना पाहिले गेले आहे.

Comments are closed.