LA 2028: ऑलिम्पिकमधील क्रिकेट सामन्यांचे ठिकाण जाहीर, आयसीसीचे सीईओ संजोग गुप्तांनी दिली माहिती
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) संजोग गुप्ता यांनी ऑलिम्पिक खेळांसंदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे. २०२८ मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत क्रिकेटचा सहभाग आहे. ही स्पर्धा अमेरिकेच्या लॉस एंजलिसमध्ये पार पडणार असून त्यामधील क्रिकेटच्या सामन्यांसाठीचे स्टेडियम निश्चित झाले आहे. कॅलिफोर्नियातील पोमोनामध्ये हे सामने खेळले जाणार आहेत.
ऑलिम्पिकमधील क्रिकेटचे सामने पोमोनामधील फेअरप्लेक्स येथे असलेल्या लॉस एंजलिस नाईट रायडर्सच्या (एलएकेआर) घरच्या मैदानावर आयोजित केले जाणार आहेत. कॅलिफोर्नियातील पोमोनामध्ये झालेल्या भूमिपूजनामध्ये बोलताना गुप्ता यांनी ही माहिती दिली. त्यांनी या कार्यक्रमाचे वर्णन ‘१२८ वर्षांच्या वचनाची पूर्तता’ असे केले.
गुप्ता म्हणाले, “जगातील दुसऱ्या क्रमांकाचा लोकप्रिय खेळ अनेक वर्षे ऑलिम्पिकमधून गायब होता. जेव्हा आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिकने क्रिकेटला मंजुरी दिली, तेव्हा तो क्षण खूपच महत्त्वाचा होता. ती केवळ एक घोषणा नाही तर अब्जावधी लोकाच्या आवडत्या खेळाला ऑलिम्पिकने प्रोत्साहन देण्याची आवश्यकता यातून दिसून येते.”
“पोमोना येथे एलए२८ साठी क्रिकेटचे घर उभारले जात असताना, पुढील दोन वर्षांच्या प्रवासात असे अनेक महत्त्वाचे टप्पे गाठले जातील, जे या प्रसंगाचे महत्त्व, संस्कृती आणि सामुदायिक भावना वाढवतील, ” असेही गुप्ता यांनी पुढे म्हटले आहे.
“क्रिकेट एक जागतिक खेळ म्हणून स्वत:ला प्रस्थापित करण्याच्या दिशेने मोठी झेप घेत आहे. त्याचा अधिक विस्तार करण्यावर आमचे लक्ष केंद्रित आहे. ऑलिम्पिकचा भाग असणे ही एक अभिमानाची बाब आहे”, असे आयसीसीचे अध्यक्ष जय शाह यांनी म्हटले आहे.
पोमोनाच्या फेअरप्लेक्समधील क्रिकेट स्टेडियमच्या बांधकामाला सुरुवात झाली आहे. हे आधी मेजर लीग क्रिकेट (एमएलसी) मधील लॉस एंजेलिस नाईट रायडर्स संघाचे होम ग्राऊंड असेल. तसेच एलए २०२८ ऑलिम्पिकमधील क्रिकेट सामन्यांचे यजमानपदही भूषवणार आहे. १४ ते ३० जुलै दरम्यान एलए२८ ऑलिम्पिक आयोजित केले जातील.
ऑलिंपिक खेळांच्या पार्श्वभूमीवर, मेजर लीग क्रिकेट (एमएलसी) फ्रँचायझी लॉस एंजेलिस नाइट रायडर्ससाठी १ ते ५ जुलै दरम्यान होणाऱ्या तीन सामन्यांकरिता फेअरप्लेक्स ग्राऊंड हे घरचे मैदान असेल.
ऑलिम्पिकमध्ये १२८ वर्षांनंतर क्रिकेट- एलए २८ मधील क्रिकेटचे सामने लॉस एंजेलिसमध्ये होणार आहे. याचे मुख्य ठिकाण एलएकेआरचे होम ग्राउंड फेअरप्लेक्स आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीद्वारे २०२३ मध्ये याला मान्यता मिळाली असून हे सामने टी२० स्वरुपाचे खेळले जाणार आहेत. तसेच १९०० च्या उन्हाळी ऑलिम्पिकनंतरचा क्रिकेटचा हा पहिलाच ऑलिम्पिक सहभाग आहे.
Comments are closed.