अजितदादांच्या राष्ट्रवादीत आता थ्री लेअर सिस्टीम, सुनेत्रा पवारांनी मुलांना जबाबदारी वाटून दिली
राष्ट्रवादी सुनेत्रा पवार : अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासह पक्षातील सर्व महत्त्वाच्या निर्णयांची सूत्रं आणि अधिकार स्वत:च्या हाती घेणाऱ्या सुनेत्रा पवार यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चालवण्यासाठी जबाबदाऱ्यांचे तिहेरी वाटप केले आहे. त्यानुसार उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) अध्यक्षा सुनेत्रा पवार या राज्यभर फिरुन पक्ष संघटनेचे काम पाहतील. खासदार पार्थ पवार (Parth Pawar) यांच्याकडे दिल्ली आणि मुंबईची जबाबदारी असेल. तर अजित पवार यांचे कनिष्ठ चिरंजीव जय पवार यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या बारामती आणि पुणे ग्रामीण विभागाची जबाबदारी असेल. गेल्या काही दिवसांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अंतर्गत पातळीवर बऱ्याच घडामोडी सुरु आहेत. अजितदादांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांना बाजुला सारुन पक्षाची सूत्रे स्वत:च्या हातात घेण्याचा प्रयत्न काही ज्येष्ठ नेत्यांनी केल्याची चर्चा होती. या पार्श्वभूमीवर आता सुनेत्रा पवार यांनी भविष्यात कोणताही दगाफटका टाळण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सर्व सूत्रे आपल्या कुटुंबाच्याच हातात ठेवण्याच्यादृष्टीने हा निर्णय घेतला असू शकतो, अशी चर्चा आहे. (Maharashtra Politics News)
अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांचे दोन्ही पुत्र पार्थ पवार आणि जय पवार हे राजकारणात पूर्वीपेक्षा अधिक सक्रिय झाले आहेत. पार्थ पवार हे सुनेत्रा पवार यांच्या जागी राज्यसभेवर निवडून गेले. तर जय पवार यांनी बारामतीमधील आपला जनसंपर्क वाढवला आहे. कालच पार पडलेल्या बारामती पोटनिवडणुकीच्या निमित्ताने हे दिसून आले. आगामी काळात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्या नाहीत तर त्यादृष्टीने बारामती आणि राज्यभरात अजितदादा गटाची ताकद कायम राहील, यासाठी सुनेत्रा पवार आणि त्यांचे दोन्ही चिरंजीव धोरणात्मकदृष्टीने कामाला लागले आहेत. याच रणनीतीचा एक भाग म्हणून सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील जबाबदाऱ्या तिहेरी पातळीवर वाटून घेतल्या असाव्यात, असा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे.
Baramati news: 2029 च्या विधानसभा निवडणुकीत बारामतीत पवार विरुद्ध पवार लढाई?
काल बारामती पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरु असताना जय पवार आणि रोहित पवार यांच्यात एक सुप्त संघर्ष रंगताना दिसून आला होता. जय पवार यांनी सकाळी मतदानाला सुरुवात झाल्यानंतर 2029 च्या विधानसभा निवडणुकीबाबत भाष्य केले होते. 2029 मध्ये मी विधानसभेचा उमेदवार व्हावे, अशी लोकांची आणि कार्यकर्त्यांची मागणी असल्याचे जय पवार यांनी म्हटले. यावर रोहित पवार यांना प्रतिक्रिया विचारली तेव्हा 2029 च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते. जय पवार उमेदवार असतील तर इकडून युगेंद्र पवार उमेदवार असू शकतात, असे रोहित पवार यांनी सांगितले होते.
आणखी वाचा
रोहित आणि जयने आज तरी तसं बोलायला नको होतं, अजितदादांच्या बंधूंनी सौम्य शब्दात कुणाकुणाला खडसावलं?
आणखी वाचा
Comments are closed.