रुक्मिणीबाई रुग्णालयाचा बेबंद कारभार… १०८ अ‍ॅम्ब्युलन्स ४० मिनिटे उशिरा आली, ज्येष्ठ नागरिकाचा तडफडून मृत्यू

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयाच्या बेबंद कारभाराने एका ज्येष्ठ नागरिकाचा बळी गेला. आपत्कालीन आरोग्य सेवेसाठी असलेली १०८ अॅम्ब्युलन्स तब्बल पाऊण तास उशिरा आली. त्यामुळे उपचाराअभावी कल्याण रेल्वे स्थानक परिसरात अत्यवस्थ रुग्णाचा तडफडून मृत्यू झाला. संतापजनक बाब म्हणजे घटनास्थळ ते हॉस्पिटलपासून अंतर अवघ्या तीन मिनिटांवर होते. तरीही अॅम्ब्युलन्स पाऊण तासाने आली. रुग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे मेवालाल गुप्ता (६५) यांना हकनाक जीव गमवावा लागल्याने सर्वत्र चीड व्यक्त होत आहे.

महापालिकेच्या आरोग्य व्यवस्थेच्या कार्यक्षमतेवर यानिमिताने गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. मेवालाल गुप्ता यांची बुधवारी रात्री १० वाजता कल्याण रेल्वे स्थानक परिसरात अचानक प्रकृती बिघडली. दीपक हॉटेलजवळ पायी जात असताना त्यांना छातीत तीव्र वेदना जाणवू लागल्याने त्यांनी तत्काळ १०८ आपत्कालीन सेवेला फोन करून रुग्णवाहिकेची मागणी केली. त्यांच्या प्रकृतीत झपाट्याने बिघाड होत असल्याचे पाहून स्थानिक नागरिकांनीही वारंवार १०८ वर संपर्क करूनही रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचण्यास तब्बल ४० मिनिटांचा विलंब झाला. विशेष म्हणजे दीपक हॉटेल ते रुक्मिणीबाई रुग्णालय हे अंतर अवघे तीन मिनिटांचे असतानाही आपत्कालीन मदत वेळेत मिळू शकली नाही. या विलंबामुळेच मेवालाल गुप्ता यांचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी केला.

तर जीव वाचला असता

घटनास्थळी पोहोचलेल्या अॅम्ब्युलन्समध्ये डॉक्टर नव्हते. वेळेत उपचार मिळाले असते तर रुग्णाचा जीव वाचला असता, असा दावा स्थानिकांनी केला. मात्र नागरिकांचे आरोप १०८ अॅम्ब्युलन्समधील डॉ. मोहम्मद तोफिक आणि चालक प्रकाश चोरगे यांनी फेटाळले. त्यांच्या म्हणण्यानुसार रात्री १० वाजून २९ मिनिटांनी कॉल प्राप्त झाल्यानंतर ते अवघ्या १२ मिनिटांत घटनास्थळी पोहोचले होते. तपासणी केल्यानंतर संबंधित व्यक्तीचा मृत्यू झालेला असल्याचे त्यांनी सांगितले.

Comments are closed.