Iran America War – स्फोटांच्या आवाजांनंतर इराणची राजधानी हाय अलर्टवर, हवाई सुरक्षा यंत्रणा सक्रिय

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

इराणच्या काही भागांमध्ये हवाई हल्ल्यांसारख्या हालचाली आणि जोरदार स्फोटांचे वृत्त समोर आल्यानंतर गुरुवारी संध्याकाळी राजधानी तेहरानमध्ये खळबळ उडाली. या संभाव्य धोक्याची दखल घेत इराणच्या सुरक्षा दलांनी तातडीने हवाई संरक्षण यंत्रणा सक्रिय केली आहे. इराणच्या सरकारी माध्यमांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. पश्चिम तेहरानमध्ये हवाई सुरक्षा यंत्रणेने केलेल्या गोळीबाराचे आवाज ऐकू आल्याचे सांगण्यात आले आहे. या घटनेनंतर खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणावर सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहेत.

महत्त्वाची बाब म्हणजे, अलीकडील संघर्षानंतर युद्धविराम लागू झाल्याच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडली आहे. युद्धविरामानंतर अशा प्रकारची ही पहिलीच मोठी लष्करी हालचाल असल्याचे मानले जात आहे. मेहर वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, कोणत्याही संभाव्य हवाई हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी राजधानीच्या विविध भागांत ही यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली होती. मात्र, अद्याप कोणत्याही विशिष्ट लक्ष्यावर हल्ला झाल्याचे किंवा या कारवाईत झालेल्या नुकसानीचे अधिकृत तपशील समोर आलेले नाहीत. इर्ना या सरकारी वृत्तसंस्थेने परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचे स्पष्ट केले आहे. सुरक्षा यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Comments are closed.