Jalna News – जालना मर्चंट बँक घोटाळा, फिर्यादीच निघाला आरोपी; महाव्यवस्थापक राजेंद्र टोकशांना पोलीस कोठडी

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

सध्या संपूर्ण जिल्ह्यात चर्चेत असलेल्या जालना मर्चंट बँक घोटाळ्याला आता एक खळबळजनक वळण लागले आहे. या प्रकरणात धक्कादायक बाब म्हणजे, ज्यांनी तक्रार दिली होती तेच आता आरोपीच्या पिंजऱ्यात उभे राहिले आहेत. बँकेचे महाव्यवस्थापक राजेंद्र भिकचंद टोकशा यांना आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली असून, न्यायालयाने त्यांना सोमवार, 27 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

जालना मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेत बनावट कागदपत्रांच्या आधारे वेअर हाऊसच्या नावाखाली 177 बनावट खातेदार तयार करण्यात आले होते. या माध्यमातून तब्बल 23 कोटी 33 लाख रुपयांचा अपहार करून बँकेची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी चंदनझिरा पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. घोटाळ्याची व्याप्ती मोठी असल्याने पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल यांनी या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवला होता.

गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार रायचंद सखाराम कुरंगळ याला अटक केल्यानंतर, पोलिसांनी त्याचे साथीदार निलेश्वर भोसले, रामेश्वर जाधव, ज्ञानेश्वर जाधव आणि सुधाकर ठोंबरे यांना यापूर्वीच गजाआड केले आहे. या आरोपींच्या चौकशीतून आणि बँकेच्या शाखाधिकाऱ्यांकडून मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे, बँकेचे महाव्यवस्थापक राजेंद्र टोकशा यांचाही या कटात सक्रिय सहभाग असल्याचे समोर आले. पुरावे मिळताच पोलिसांनी 24 एप्रिल रोजी टोकशा यांना बेड्या ठोकल्या.

राजेंद्र टोकशा यांच्या चौकशीतून या घोटाळ्यातील आणखी काही बड्या व्यक्तींची नावे समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सध्या मुख्य आरोपी रायचंद कुरंगळ आणि निलेश्वर भोसले यांच्यासह टोकशा यांनाही सोमवारपर्यंत पोलीस कोठडी मिळाली असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक सखोल तपास करत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी आणि प्रभारी पोलीस उपअधीक्षक सुरेश उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे, पोलीस उपनिरीक्षक शैलेश म्हस्के आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अत्यंत कौशल्याने पार पाडली. या कारवाईमुळे जालना बँकिंग क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

Comments are closed.