IPL 2026: सूर्यकुमार यादव खराब फॉर्ममुळे अडचणीत! वसीम जाफरने दिला मोलाचा सल्ला
भारतीय टी-20 संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) सध्या कठीण काळातून जात आहे. त्याच्या खराब फॉर्ममुळे त्याच्याकडून कर्णधारपद काढून घेतले जाण्याची चर्चाही सुरू झाली आहे. आयपीएल (IPL) 2026 मध्ये मुंबई इंडियन्ससाठी (Mumbai Indians) खेळताना सूर्याची कामगिरी निराशाजनक राहिली असून, 7 सामन्यांत त्याने केवळ 157 धावा केल्या आहेत.
याच दरम्यान, माजी क्रिकेटपटू वसीम जाफर (Wasim jafar) यांनी सूर्याच्या फलंदाजीबाबत त्याला सावध केले असून एक खास सल्ला दिला आहे. वसीम जाफर यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे सांगितले की, आता सर्व संघांना सूर्यकुमारच्या खेळण्याच्या शैलीचा अंदाज आला आहे. गोलंदाजांनी सूर्याविरुद्ध अशी लाईन पकडली आहे, ज्यामुळे त्याला त्याचे आवडते ‘ट्रेडमार्क’ शॉट्स खेळणे कठीण होत आहे. विरोधी संघ आता अशी फिल्डिंग लावत आहेत की सूर्याला विकेटच्या मागे किंवा लेग साईडला फटके मारता येणार नाहीत. जाफर यांच्या मते, सूर्या प्रत्येक वेळी एकाच सापळ्यात अडकून बाद होत आहे.
दिग्गज क्रिकेटपटू वसीम जाफर यांनी सूर्याला आता आपली रणनीती बदलण्यास सांगितले आहे, सूर्या आता प्रतिस्पर्धी संघांसाठी ‘प्रिडिक्टेबल’ झाला आहे. त्याला आता ‘प्लान B’ ची गरज आहे. त्याने आता मैदानासमोर किंवा कवर्सच्या दिशेने शॉट्स खेळण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जाफर यांच्या मते, सूर्यकुमार हा एक जागतिक दर्जाचा खेळाडू आहे, त्यामुळे त्याने वारंवार एकाच चुकीमुळे बाद होणे टाळले पाहिजे आणि समोरच्या बाजूला खेळून गोलंदाजांवर दबाव आणला पाहिजे.
Comments are closed.