आप नेते सोमनाथ भारती यांची निर्दोष मुक्तता

आफ्रिकन महिलांवरील हल्लाप्रकरणी न्यायालयाचा मोठा दिलासा

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

दिल्लीतील राऊस अॅव्हेन्यू न्यायालयाने आम आदमी पक्षाचे नेते सोमनाथ भारती यांना शुक्रवारी मोठा दिलासा दिला. 2014 मध्ये आफ्रिकन महिलांवर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणात सोमनाथ भारती आणि इतर 16 जणांची निर्दोष मुक्तता केली. हा निकाल राऊस अॅव्हेन्यू न्यायालयाच्या अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी नेहा मित्तल यांनी दिला. सुनावणीदरम्यान, आफ्रिकन महिलांचे जबाब ग्राह्य धरले जाणार नाहीत, कारण त्या साक्ष देण्यासाठी न्यायालयात हजर झाल्या नव्हत्या, असा निकाल न्यायालयाने दिला. तसेच जमावाने ‘बेकायदेशीर जमाव’ जमवल्याचा कोणताही पुरावा सादर केला गेला नाही, असेही न्यायालयाला आढळले. पोलिसांनी एफआयआर नोंदवण्यास केलेल्या विलंबाचे योग्य स्पष्टीकरण देण्यासही फिर्यादी पक्ष अपयशी ठरला.

आम आदमी पक्षाने या निर्णयाचे स्वागत केले. पक्षाच्या प्रवक्त्यांच्या मते, सोमनाथ भारती केवळ एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून स्थानिक लोकांच्या समस्या मांडण्यासाठी गेले होते, परंतु एका राजकीय कटाचा भाग म्हणून त्यांना गोवण्यात आले. ‘12 वर्षांच्या प्रदीर्घ संघर्षानंतर सर्व आरोपींची सन्मानपूर्वक निर्दोष मुक्तता झाली आहे. या प्रकरणात मी आणि खिरकी, जहापनाह व हौझरानी येथील इतर 17 रहिवासी सामील होते. युगांडा आणि इतर दक्षिण आफ्रिकन देशांशी संबंधित ड्रग माफिया आणि मानवी तस्करांविरुद्धच्या कथित कृत्यांसाठी हा खटला दाखल करण्यात आला होता.’ असे सोमनाथ भारती यांनी इन्स्टाग्रामवर लिहिले आहे.

15 आणि 16 जानेवारी 2014 च्या मध्यरात्री, तत्कालीन कायदामंत्री सोमनाथ भारती यांनी आपल्या समर्थकांसह दक्षिण दिल्लीतील खिरकी एक्सटेंशन भागातील एका घरावर छापा टाकला होता. भारती आणि त्यांच्या समर्थकांनी तेथे राहणाऱ्या आफ्रिकन वंशाच्या महिलांना वाईट वागणूक दिली आणि त्यांच्यावर हल्ला केला, असा आरोप होता. अखेरीस हे प्रकरण न्यायालयापर्यंत पोहोचल्यानंतर आम आदमी पक्षाचे नेते कायद्याच्या कचाट्यात सापडले होते. मात्र, आता ते सर्वजण निर्दोष मुक्त झाले आहेत.

Comments are closed.