IPL 2026 बंगळुरूचा विराट आनंद… विराटच्या 81 धावांपुढे सुदर्शनचे शतक व्यर्थ

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

साई सुदर्शनच्या तडाखेबंद 100 धावांच्या शतकी खेळीच्या जोरावर गुजरातने 206 धावांचे आव्हान बंगळुरूपुढे ठेवले. पण देवदत्त पडिक्कल आणि विराट कोहलीच्या 115 धावांच्या भागीच्या जोरावर बंगळुरूने सात चेंडू आणि पाच गडी राखून आपल्या पाचव्या विजयाची नोंद केली. या विजयामुळे बंगळुरू पुन्हा दुसऱया स्थानावर विराजमान झाली आणि साई सुदर्शनचे शतक व्यर्थ गेले.

गुजरातचे 206 धावांचे आव्हान बंगळुरूसाठी धोकादायक ठरेल असा अंदाज होता. मोहम्मद सिराजने आपल्या दुसऱयाच षटकात जेकब बेथेलची विकेट काढत गुजरातला अपेक्षित सुरुवात करून दिली. पण यानंतर गुजरातच्या गोलंदाजीची धारच बोथट झाली. मैदानात असलेल्या विराट कोहली आणि देवदत्त पडिक्कल यांनी घणाघाती फटकेबाजी करत डावातील आव्हानाची हवाच काढून टाकली. एकीकडे विराटही गोलंदाजी पह्डून काढत होता तर पडिक्कलनेही 20 चेंडूंत अर्धशतक ठोकताना 6 षटकार आणि 2 चौकार खेचले. विराटनेही 30 चेंडूंत पन्नाशी गाठली. मग 47 चेंडूंत शतकी भागी साकारताना संघाच्या विजयाचा पायाही रचला. दोघांनी 10 षटकार आणि 10 चौकार खेचत 115 धावांची भागीही रचली. पडिक्कलनंतर विराटनेही टी-20 ला साजेसा खेळ करत आरसीबीचा विजय निश्चित केला. कोहली बाद झाल्यावर जितेश शर्मा आणि रजत पाटीदार लवकर बाद झाले, पण टीम डेव्हिड आणि कृणाल पंडय़ाने आपल्या संघाच्या विजयाची नोंद केली.

सुदर्शनची बॅट फिरली

सुदर्शन पुन्हा एकदा घणाघाती खेळला. त्याने गिलसह 128 धावांची भागी रचली. यात गिलचा फक्त 38 धावा होत्या. त्यानंतर प्रत्येक फलंदाजाने तिशीपेक्षा अधिक खेळय़ा करत संघाला दोनशेच्या समीप पोहोचवले. आज सुदर्शन वन मॅन आर्मी असला तरी त्याच्या खेळीला एकाही फलंदाजाची अपेक्षित साथ लाभली. परिणामतः गुजरातचा डाव 205 पर्यंतच पोहोचला आणि त्यापैकी निम्म्या धावा एकटय़ा सुदर्शनच्या होत्या.

2000 धावांत सुदर्शन सुपरफास्ट

साई सुदर्शनने वेगवान शतकी खेळी ठोकताना आपल्या वेगवान 2000 हजार धावांचा टप्पाही ओलांडला. त्याने अवघ्या 47 डावांत हा टप्पा पार करत त्याने 48 डावांत विक्रम करणाऱया ख्रिस गेललाही मागे टाकले. या हंगामात त्याने 7 डावांत 235 धावा केल्या असल्या तरी राजस्थानविरुद्ध 73 आणि आजचे शतक ही त्याची खास ‘हायलाइट्स’ ठरली आहेत.

Comments are closed.