आखाती देशातील युद्ध जगातील 3 कोटी लोकांना गरिबीत ढकलणार; संयुक्त राष्ट्रांचा धोक्याचा इशारा

अमेरिका, इस्रायल-इराण युद्धामुळे आखाती देशात अद्यापही तणावाचे वातावरण आहे. सध्या दोन्ही देशात शस्त्रसंधी असली तरी शांतता करार झाला नसल्याने आखाती देशात तणाव वाढत असून जगात चिंतेचे वातावरण आहे. या युद्धामुळे आखाती देशच नाही तर संपूर्ण जगाला मोठा फटका बसला आहे. तसेच संयुक्त राष्ट्रांनी आता जगाला धोक्याची सूचना दिली आहे.

50 दिवसांहून अधिक काळ चाललेल्या अमेरिका आणि इराणमधील युद्धात सध्या शस्त्रसंधी सुरू असली तरी जागतिक तणाव कायम आहे. होर्मुझची सामुद्रधुनी बंद असल्यामुळे जगभरातील अनेक देशांमध्ये कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूचा पुरवठा ठप्प झाला आहे.

या पार्श्वभूमीवर, संयुक्त राष्ट्रांच्या विकास प्रमुखांनी एक गंभीर इशारा दिला आहे की, अमेरिका-इराण युद्धामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे अंदाजे ३ कोटी लोक गरिबीत लोटले जाऊ शकतात. या अहवालात यामागील प्रमुख कारणांचाही उल्लेख आहे.

अमेरिका आणि इराणमधील युद्धाचा जगावर मोठा परिणाम झाला आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनी बंद असल्यामुळे कच्चे तेल आणि नैसर्गिक वायू पुरवठ्याचे संकट अधिकच गडद झाले आहे. हे युद्ध जगातील ३ कोटी लोकांना गरिबीत ढकलू शकते, असा धोकादायक इशारा संयुक्त राष्ट्रांनी दिला आहे.

रॉयटर्सच्या वृत्तानुसार संयुक्त राष्ट्रांचे विकास प्रमुख अलेक्झांडर डी क्रू यांनी मध्य-पूर्वेवरील धोकादायक परिणामांवर लक्ष केंद्रित केले आहे आणि एक मोठा इशारा दिला आहे. त्यांनी सांगितले की, अमेरिका-इराण युद्धामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये मालवाहू जहाजांवर सतत होणाऱ्या नाकेबंदीमुळे केवळ इंधनावरच नव्हे, तर खतांच्या पुरवठ्यावरही परिणाम झाला आहे, ज्यामुळे कृषी उत्पादनावर थेट परिणाम होत आहे. पिकांच्या उत्पन्नावरील हा परिणाम या वर्षाच्या अखेरीस स्पष्टपणे दिसून येईल.

क्रू यांनी पुढे असेही म्हटले आहे की, अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध संपले तरी, त्याचे आधीच दिसणारे परिणाम सुरूच राहतील, त्यामुळे जगभरातील ३ कोटी किंवा त्याहून अधिक लोक गरिबीत ढकलले जातील. या संघर्षाच्या अप्रत्यक्ष परिणामांमुळे येत्या काही महिन्यांत अन्नसुरक्षेचा अभाव वाढण्याची शक्यता आहे.

संयुक्त राष्ट्र अन्न आणि कृषी संघटनेने (FAO) गेल्या आठवड्यात असाच इशारा दिला आहे की, मध्य-पूर्वेतील युद्धामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीतील दीर्घकाळ चालणाऱ्या संकटामुळे जागतिक अन्न संकट निर्माण होऊ शकते. हिंदुस्थान, बांगलादेश, श्रीलंका, सोमालिया, सुदान, टांझानिया, केनिया आणि इजिप्त यांसारख्या देशांना याचा सर्वाधिक धोका आहे. अहवालात म्हटले आहे की, येत्या काही महिन्यांत अन्न असुरक्षितता मोठ्या प्रमाणावर पसरेल आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यावर फार काही करता येणार नाही.

Comments are closed.