…तर आम्ही प्रत्युत्तर देऊ! अमेरिकेसोबतच्या चर्चेपूर्वी होर्मुझ मुद्द्यावरून इराणचा इशारा

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ पाकिस्तानात आहे. अमेरिका आणि इराण यांच्यात थेट चर्चा होण्याची शक्यता आहे. मात्र, दोन्ही देशात चर्चा होण्याची शक्यता असतानाच तणावही कायम आहे. अमेरिकेने नाकेबंदी आणि समुद्रातील लूटमार सुरू ठेवल्यास कठोर प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा इराणने चर्चेपुर्वी दिला आहे.

इराणच्या लष्कराने शनिवारी स्पष्ट केले आहे की, अमेरिकेने इराणी बंदरांची नाकेबंदी सुरू ठेवल्यास ते कठोर प्रत्युत्तर देतील. त्यामुळे होर्मुझवरून इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव अजूनही कायम असल्याचे दिसून येत आहे. अमेरिका आणि इस्रायलसोबत सुमारे दोन महिन्यांपूर्वी युद्ध सुरू झाल्यापासून प्रथमच शनिवारी तेहरानच्या इमाम खोमेनी आंतरराष्ट्रीय विमानतळावर व्यावसायिक विमानसेवा पुन्हा सुरू झाली. त्यामुळे वातावरण पुन्हा सामान्य होत असल्याचे दिसत असतानाच इराणी लष्कराने आणखी एक धमकी दिली आहे.

सरकारी वृत्तसंस्था आयआरआयबीने (IRIB) प्रसिद्ध केलेल्या एका निवेदनात, लष्कराच्या केंद्रीय कमांड, खतम अल-अंबियाने म्हटले आहे की, अमेरिकी सैन्याने या प्रदेशात नाकेबंदी, लूटमार आणि चाचेगिरी सुरू ठेवली, तर त्यांनी हे निश्चितपणे लक्षात ठेवावे की त्यांना इराणच्या शक्तिशाली सशस्त्र दलांकडून चोख प्रत्युत्तर मिळेल. आम्ही सज्ज आणि दृढनिश्चयी आहोत, तसेच शत्रूच्या वर्तनावर आणि हालचालींवरही लक्ष ठेवून आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे दोन्ही देशातील चर्चेपुर्वी तणाव वाढल्याचे दिसत आहे.

Comments are closed.