‘नवे इतिहासतज्ञ’ बागेश्वर बाबांनी शिवरायांचा इतिहास बदलला; म्हणे, छत्रपती शिवाजी महाराज लढून थकले होते!
भोंदूबाबांचे नवनवे कारनामे आणि नेत्यांच्या वादग्रस्त विधानांनी महाराष्ट्र ढवळून निघाला असताना आता ‘नवे इतिहासतज्ञ’ बागेश्वर बाबांनी थेट शिवरायांचा इतिहासच बदलून टाकला आहे. ‘छत्रपती शिवाजी महाराज लढून थकले होते. त्यामुळे त्यांनी समर्थ रामदासांकडे जाऊन आपण राज्य कारभार सांभाळावा!’ अशी प्रार्थना केल्याचे बागेश्वर बाबा म्हणाले. विशेष म्हणजे नागपूरमध्ये आयोजित कार्यक्रमात खुद्द राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोरच त्यांनी अकलेचे तारे तोडले! या वक्तव्यावरून राज्यभरात शिवप्रेमींमधून संतापाची लाट उसळली आहे.
बागेश्वर बराले…
युद्धे आणि संघर्षामुळे शिवरायांनी थकून आपला मुकुट समर्थ रामदासांच्या पायाशी ठेवला आणि म्हणाले, आता तुम्हीच राजपाट सांभाळा! यावर ‘तू माझा शिष्य आहेस आणि मी तुझा गुरू’ असे सांगत समर्थ रामदास यांनी मुकुट पुन्हा शिवरायांच्या मस्तकावर ठेवून कारभाराची जबाबदारी सोपवली.
बागेश्वर बाबांनी यावेळी बोलताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मात्र कौतुक केले. भारतावर संकट आले की संघाचे कार्यकर्ते लोकांचे प्राण वाचवण्यासाठी पुढे येतात. त्यामुळे चार मुले जन्माला घाला आणि त्यातील एक मूल संघाला द्या, असे आवाहनही बागेश्वर बाबांनी केले.
नागपुरातील जामठा येथे भारतदुर्गा मंदिराचे भूमिपूजन आणि कोनशिला अनावरण सोहळय़ात बागेश्वर बाबा बोलत होते. यावेळी त्यांनी शिवराय आणि समर्थ रामदास यांच्या भेटीतील एक प्रसंग सांगितला. या भेटीत शिवरायांनी राजपाट सोडण्याची तयारी दर्शवली. यावर समर्थ रामदास शिवरायांना म्हणाले, ‘तू कोण आहेस?’, यावर शिवराय म्हणाले, ‘मी शिष्य आहे.’ मग गुरूचे काम काय आणि शिष्याचे कर्तव्य काय? यावर शिवराय म्हणाले, ‘गुरू आज्ञा देतो आणि शिष्य ती पाळतो’! यानंतर समर्थ रामदासांनी शिवरायांच्या मस्तकावर मुकुट ठेवून म्हणाले की, ‘राज्य माझं असेल, पण ते चालवायचं काम तुम्ही करणार!’ असे सांगितल्याचा दावाही बागेश्वर बाबांनी केला.
फडणवीस काय म्हणाले…
महापुरुषांबद्दल वेगवेगळय़ा राज्यांत वेगवेगळय़ा प्रकारच्या लोककथा तयार होतात. रामायण आणि महाभारतासंदर्भातही अनेक कथा आहेत. इतिहास किंवा परिस्थितीवर अशा कथा अवलंबून असतात. मात्र आपण इथे इतिहास शिकलो आणि जे ग्रंथ उपलब्ध आहेत त्यात बागेश्वर बाबांनी सांगितलेला दाखला नाही, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
Comments are closed.