महाराष्ट्रात ‘वणवा’! पारा @ 45… उष्माघाताने दोघांचा मृत्यू

राज्यात सूर्य आग ओकत असल्याने संपूर्ण महाराष्ट्रात अक्षरशः उष्णतेचा ‘वणवा’च पेटला आहे. विदर्भात सरासरी तापमानाने 45 अंश सेल्सिअसचा आकडा पार केल्याने प्रचंड उकाडय़ामुळे नागरिकांचा घामटा निघत आहे. उष्णतेच्या लाटेमुळे चक्कर येणे, बेशुद्ध पडणे असे प्रकार घडत आहेत. लातूरच्या औसा तालुक्यातील गोंद्री गावात नऊ महिन्यांच्या बाळाचा तर जळगावमध्ये रावेर शहरात एका बांधकाम कामगाराचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचीही घटना घडली आहे.

एकीकडे कमाल तापमानाच्या पाऱ्यात वाढ होत असली तरी दुपारनंतर ढगाळ वातावरणामुळे नागरिक मात्र उकाडय़ाने हैराण होत आहेत. उष्णतेचा सर्वाधिक प्रभाव विदर्भामध्ये दिसून येत आहे. आज अकोला व अमरावतीमध्ये विक्रमी 45.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पुढील तीन ते चार दिवस हीच स्थिती कायम राहणार असल्याने टेन्शन वाढले आहे. प्रचंड उकाडय़ात काही भागांत अवकाळी पाऊसही पडत आहे. यामध्ये कोकण, जळगाव, नाशिक, बीड, लातूर आणि सांगलीमध्ये पाऊसही पडला. या पार्श्वभूमीवर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ासाठी हवामान खात्याकडून ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.

मुंबई, कोकणातही उष्णतेची लाट

मुंबईसह कोकणातील अनेक भागांत शनिवारी पारा 36 अंश सेल्सिअसपर्यंत गेला. यातच वाढलेली आर्द्रता, कधी दमट हवामान तर कधी तापदायक सूर्यकिरणांमुळे मुंबईकरांचा घामटा निघाला. मुंबई महानगरात उष्णतेचा पारा 40 अंशांपर्यंत गेला. पुढील दोन दिवस मुंबई महानगरात हीच स्थिती राहणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला.

'l निनो'मुळे 10 मेपर्यंत 'ताप'

‘एल निनो’ वादळाच्या प्रभावामुळे राज्यात 10 मेपर्यंत तापमानात वाढ कायम राहणार असून त्यानंतर तापमान कमी होत जाणार असल्याचे भारतीय हवामान खात्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

तापमानाची नोंद

(भाग सेल्सिअसमध्ये)

मुंबई              36.2

पुणे                39.9

ठाणे               39.0

रत्नागिरी        36.3

कोल्हापूर        38.2

सातारा           38.1

माथेरान         37.2

नाशिक           41.5

बुध चढणार, पाऊस बरसणार

राज्यात रविवारी मध्य महाराष्ट्रासह मराठवाडय़ात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मात्र विदर्भात 26 आणि 27 एप्रिल रोजी उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

Comments are closed.