ऐकावे जनांचे…- संयत पॉडकास्टर

>> अक्षय मोटेगावकर
[email protected]

अत्यंत मोजक्या शब्दांत थेट प्रश्न विचारत वक्त्यांना मनमोकळं बोलतं करणारा चतुरस्र संयत पॉडकास्टर शुभंकर मिश्रा याचे त्याच्याच नावाचे यूटय़ूब चॅनेल आवर्जून ऐकावे असे.

जेन एक्स म्हणजे 1965 ते 1980 मध्ये जन्माला आलेल्या मुलांची पिढी आणि जेन वाय किंवा मिलेनियल्स म्हणजे 1981 ते 1996 या काळात जन्माला आलेल्या मुलांची पिढी. या जेन एक्स आणि मिलेनियल्स मंडळींना गप्पांचे तीन विषय दिवस-रात्र पुरत. किंबहुना या तीन विषयांवरच त्यांच्या गप्पांचा, अस्मितांचा, आवडी-निवडींचा आणि तडफेने बाजू घेण्याचा पिंड पोसला गेला आणि त्या म्हणजे चित्रपट, राजकारण आणि क्रिकेट. भारतात या तीन गोष्टींमध्ये रस नसलेला माणूस विरळाच म्हणावा लागेल. रूढार्थाने उपजिवीकेसाठी घेतलेले शिक्षण कोणतेही असो, पण या गोष्टींत त्याला रस असतोच. त्यामुळे या काळात जन्माला आलेल्या मुलांच्या गप्पांमध्ये हे उल्लेख किंवा विषयांतरे सहज पाहायला मिळतात. 10 एप्रिल 1993 ला जन्माला आलेला शुभंकर मिश्रा तरी यासाठी कसा अपवाद ठरेल. शुभंकर मिश्रा याच नावाचे त्याचे यूटय़ूब चॅनेल असून एक्याऐंशी लाखांहून अधिक त्याचे यूटय़ूब सबक्राइबर्स आहेत आणि चॅनेलवर 4,400 हून अधिक व्हिडीओज आहेत, पण यात बहुतांश व्हिडीओज हे या तीन क्षेत्रांतील व्यक्तींबरोबरचे पाडकास्टस्, मुलाखतींचे आहेत. पण अर्थातच हे तेवढय़ापुरतेच सीमित आहे असं नाही, तर गुन्हेगारी, आरोग्य, स्टार्टअप आणि उद्योजकता, अर्थकारण व इतर विषयांवरचेदेखील पाडकास्टस आहेत. यासोबतच शुभंकर मिश्रा न्यूजबूक आणि एक्सप्लेनेर हे शो पण चालवतो.

शुभंकर शिक्षणाने मेकॅनिकल इंजिनीअरिंगमधील पदवीधर, पण आवड म्हणून पत्रकारितेच्या क्षेत्रात घुसला. पत्रकारितेत बीए केले आणि इंडिया न्यूज, झी न्यूज, टीव्ही 9, इंडिया टुडेच्या आजतकसाठी काम केले, पण हे करत असतानासुद्धा स्वत चे असे काहीतरी करावे ही ऊर्मी त्याला स्वस्थ बसू देत नव्हती आणि मग त्याने स्वत चे यूटय़ूब चॅनल काढले आणि त्यावरूनच तो विविध मुलाखती, पाडकास्टस् करू लागला. मी ऐकलेला शुभंकर मिश्राने केलेल्या मुलाखतीचा पहिला पाडकास्ट हा चरित्र अभिनेता पंकज त्रिपाठी यांच्या बरोबरचा होता. साधारणत दोन वर्षांपूर्वी यूटय़ूबवर प्रदर्शित झालेला. पंकज त्रिपाठी हे खरे तर फार आवडते कलाकार. त्यामुळे त्या पाडकास्टमध्ये पंकज त्रिपाठी यांच्यासाठी चित्रपट म्हणजे काय? ते या माध्यमाकडे कोणत्या नजरेने पाहतात? चित्रपट कसा बनवला जातो? चित्रपटाची निवड करताना पंकज त्रिपाठी काय निकष लावतात यावर जास्त बोलणे अपेक्षित होते, पण शुभंकर याने पंकज त्रिपाठी यांना आपल्या बालपणापासून खेडेगावातील राहणीमानाबद्दल, अनुभवांबद्दल, खेडय़ातून शहराकडच्या प्रवासाबद्दल, इगो, माध्यमातून आलेली प्रसिद्धी, चित्रपट क्षेत्राचे वास्तव आणि एकंदरीतच आयुष्याकडे बघण्याच्या प्रवासाबद्दल जास्त बोलतं केलं. हा पाडकास्ट कुठेही कृत्रिम वाटला नाही. शुभंकर याने अत्यंत मोजक्या शब्दांत आणि थेट प्रश्न विचारले व पंकज त्रिपाठी यांना मनमोकळं बोलतं केले. यशासाठी सातत्य आणि धैर्य या गोष्टी किती महत्त्वाच्या आहेत हे या पाडकास्टमधून फार परिणामकारकपणे कळाले.

‘धुरंधर द रिव्हेंज’ चित्रपटातील ‘जाईये सजना’ या गाण्याने लोकप्रियतेचे शिखर सर करणाऱया जस्मिन सँडलास या पंजाबी गायिकेबरोबरचा जवळपास तीन तासांचा पाडकास्टपण ऐकण्यासारखा झाला आहे. संघर्ष पाचवीला पूजलेल्या जस्मिनने यशाला कशी गवसणी घातली आणि इतकेच काय तर मागे वळून पाहताना फक्त कृतज्ञताच कशी झिरपते हे तिच्या बोलण्यातून कळते. हिंदी चित्रपट संगीताचा सुवर्णकाळ गाजवलेल्या कुमार सानू यांच्यासोबतचा पाडकास्टदेखील छान जमून आला आहे. नव्वदच्या दशकातील किस्से, लता मंगेशकर, आशा भोसले, अनुराधा पौडवाल, अल्का याग्निक यांच्या सोबतची गाणी, गमतीजमती अशी मस्त सफर होऊन जाते या एपिसोडमध्ये. ऐकणाऱयाला नास्टॅल्जिक व्हायला होते. नव्वदच्याच दशकातील प्रसिद्ध संगीतकार आनंद राज आनंद यांच्या बरोबरच एपिसोड पण खुसखुशीत झाला आहे. पडद्यावरचे आणि पडद्यामागचे किस्से, संजय दत्त आणि गोविंदा या कलाकारांसोबतचे टय़ुनिंग, सध्याचे गाण्यांचे बदलते स्वरूप अशा खूप साऱया वेगवेगळ्या विषयांवर शुभंकर थेट गप्पा मारतात.

क्रिकेटमधून मोहम्मद शमी, प्रज्ञान ओझा, यशस्वी जैस्वाल यांचे अनुभव सांगणारे, क्रिकेटच्या बदलेल्या स्वरूपावर, दुखापतींवर, संधींवर बोलणारे पॉडकास्ट छान झाले आहेत. बॅडमिंटनपटू सायना नेहवालसोबतचा पॉडकास्टपण श्रवणीय आहे. दोनशे पन्नासपेक्षा जास्त एपिसोडस आहेत. खूप काही ऐकण्यासारखे आहे आणि म्हणूनच ऐका हो!
(लेखक कॉर्पोरेट क्षेत्रात कार्यरत असून मुक्त लेखक आहेत.)

Comments are closed.