रायगडात 392 गावांमध्ये ‘तळीये’, ‘इर्शाळवाडी’चा धोका; दरडग्रस्त गावांची संख्या 290 ने वाढली, सर्वाधिक धोका पोलादपूरला
मातीसाठी पोखरण्यात येणारे डोंगर, वृक्षांची बेसुमार होत असलेली कत्तल.. त्यातच नियम धाब्यावर बसवून डोंगर कापून केली जात असलेली बांधकामे यामुळे रायगड जिल्ह्यात तळीये आणि इर्शाळवाडीसारख्या हाहाकार उडवणाऱ्या दुर्घटनांचा धोका वाढला आहे. प्रशासनाने केलेल्या सर्वेक्षणात अशा दरडग्रस्त गावांची संख्या १०३ वरून तब्बल ३९२ वर गेली आहे. २९० ने वाढलेला हा आकडा धडकी भरवणारा असल्याने रायगडकरांची झोपच उडाली आहे. हा संभाव्य धोका लक्षात घेऊन युद्धपातळीवर आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार केला जात आहे.
२६ जुलै २००५ मध्ये आलेल्या मुसळधार पावसामुळे महाड तालुक्यातील दासगाव, रोहन, जुई, कोंडिवते, अप्पर तुडील या गावांसह पोलादपूर तालुक्यातील कुडपण, कोंढवी, कोतवाल या गावांमध्ये दरडी कोसळल्याच्या घटना घडल्या होत्या. यामध्ये जवळपास ३०० जणांचा मृत्यू झाला होता, तर २२ जून २०१५ रोजी नेरळ मोहाची वाडी येथे दरड कोसळून घडलेल्या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला. २१ व २२ जुलै २०२१ रोजी महाड येथे तळीये गावात दरड कोसळून ८४ जणांचा बळी गेला. पोलादपूर तालुक्यातील केवनाळे येथे भूस्खलन होऊन पाच जण दगावले, तर साखर सुतारवाडी येथील दरड दुर्घटनेत सहा जणांचा जीव गेला. तीन वेगवेगळ्या दुर्घटनांत एकूण ९५ जणांचा बळी गेला, २८ जण जखमी झाले. १९ जुलै २०२३ मध्ये इर्शाळवाडीत दरडीखाली गाव गडप होऊन ८४ जणांचा मृत्यू झाला होता, तर ५७ गावकऱ्यांचा शोधच लागला नाही. याशिवाय आंबेमाची, हिरकणी वाडी, मोहोत, वाघेरी, सवाद, माटवण, डाभीळ येथील शेकडो कुटुंबे विस्थापित झाल्याची दुर्घटना घडली होती.
दरडीमध्ये मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या सर्वाधिक
रायगड जिल्ह्यात आतापर्यंत दरडी कोसळून झालेल्या दुर्घटनांमध्ये सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. हा आकडा अन्य नैसर्गिक आपत्तपिक्षा अधिक आहे. त्यातच दरडग्रस्त गावांची संख्या दरवर्षी वाढत असल्याने प्रशासनाने चिंता व्यक्त केली आहे. यासाठी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली हे भयंकर संकट रोखण्यासाठी जिल्हा व्यवस्थापन यंत्रणा अॅक्शन प्लॅन तयार करत आहे.
या तालुक्यांना धोका
रायगड जिल्ह्यात दरड कोसळून दुर्घटना घडण्याची शक्यता असलेली ३९२ गावे असून, सर्वांत जास्त १४० गावे पोलादपूर तालुक्यात आहेत, तर महाड १२१, रोहा २०, म्हसळा १४, माणगाव २२, पनवेल ३, खालापूर १२, कर्जत ५, सुधागड ९, श्रीवर्धन १२, तळा ३, अलिबाग ९, मुरुड ९, पेण १३ गावे दरडग्रस्त आहेत.
Comments are closed.