ऑपरेशन लोटस नव्हे हे तर ऑपरेशन डरपोक, ‘आप’ खासदार फुटीवरून संजय राऊत यांची घणाघाती टीका
दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वातील आम आदमी पक्षाचे संस्थापक सदस्य आणि राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांच्यासह सात खासदारांनी ‘आप’ची साथ सोडून भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. यानंतर भाजपकडून ऑपरेशन लोटस राबवल्याचे बोलले जात आहे. यावरून शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला. हे ऑपरेशन लोटस नसून ऑपरेशन डरपोक असल्याची घणाघाती टीका संजय राऊत यांनी केली.
आपचं ऑपरेशन लोटस वगैरे काहीही झालेलं नाही. असे पळपुटे लोकं प्रत्येक पक्षात असतात. आमच्या पक्षातून 40 लोक गेले, ते पळपुटेच आहेत. शिवाजी महाराजांच्या राज्यात राहता आणि दिल्लीपुढे गुडघे टेकून पळून जातात. असे लोक प्रत्येक पक्षात असतात. राघव चड्ढा आणि त्याच्यासोबतच्या अन्य लोकांवर ईडीच्या धाडी पडल्या; ते घाबरले आणि पळून गेले ही गोष्ट एवढ्यापूर्तीच मर्यादित आहे. महाराष्ट्रातही तेच झालं, अजित पवारांवर धाडी पडल्या. ते 35 40 आमदार घेऊन भाजपसोबत निघून गेले. एकनाथ शिंदेच्या लोकांवर धाडी पडल्या ते पळून गेले. हे काय शौर्य आहे का? ही काय कर्तबगारी आहे का?असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला.
ऑपरेशन लोटसपेक्षाही हे ऑपरेशन डरपोक आहे. हे लोक डरपोक आणि कमकुवत मनाचे आहेत. त्यांना विचार आणि भूमिका नाही. त्यांना आपल्या पक्षाविषयी निष्ठाही नाही. म्हणून पळून जातात, असेही संजय राऊत यावेळी म्हणाले.
Comments are closed.