घरच्या मैदानावर चेन्नईचा लाजिरवाणा पराभव; गुजरातच्या एका विजयाने IPLचं संपूर्ण गणितच बिघडवलं

गुजरात टायटन्सने चेन्नई सुपर किंग्सचा पराभव केला IPL 2026 : आयपीएल 2026 च्या 37 व्या सामन्यात गुजरात टायटन्सने यजमान चेन्नई सुपर किंग्सचा त्यांच्याच बालेकिल्ल्यात, म्हणजेच चेपॉक स्टेडियमवर पराभव केला. गुजरातने हा सामना तब्बल 8 गडी राखून जिंकत स्पर्धेत जोरदार पुनरागमन केले आहे. या विजयामुळे गुणतालिकेत मोठी खळबळ उडाली असून गुजरातने थेट पाचव्या स्थानी झेप घेतली आहे. प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकांत चेन्नईला 7 बाद केवळ 158 धावा मजल मारता आली.  साई सुदर्शनच्या अर्धशतकाच्या जोरावर गुजरातने 16.2 षटकांत 162 धावा करून सामना जिंकला.

चेन्नईची पुन्हा घसरगुंडी…

एकवेळ सीएसके संघ शानदार सुरुवात करत होता. एकही विकेट न गमावता 21 धावा झाल्या होत्या. पण इथून कागिसो रबाडा आणि मोहम्मद सिराज यांनी अक्षरशः कहर केला. पुढच्या अवघ्या 7 चेंडूत संजू सॅमसन, उर्विल पटेल आणि सरफराज खान माघारी परतले. त्यानंतर डेवाल्ड ब्रेविस सुद्धा स्वस्तात बाद झाला आणि 37 धावांवर सीएसकेचे 4 विकेट्स कोसळले.

गायकवाडचा संयम… शेवटच्या 6 षटकांत गेमच पलटला

या कठीण परिस्थितीत ऋतुराज गायकवाड आणि शिवम दुबे यांनी डाव सावरला. दोघांनी मिळून 59 धावांची महत्त्वाची भागीदारी करत संघाला 100 च्या जवळ पोहोचवले. मात्र गायकवाडची फलंदाजी पूर्णपणे वेगळीच दिसत होती. एका क्षणी तो 36 चेंडूत फक्त 20 धावांवर होता, जणू कसोटी सामना खेळत होता. पण त्यानंतर त्याने गियर बदलला आणि पुढच्या 13 चेंडूत 30 धावा काढत 49 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. 14 ओव्हर्सनंतर सीएसकेचा स्कोअर फक्त 75 होता. 120 पर्यंत पोहोचणंही कठीण वाटत होतं. पण इथून गायकवाडने आक्रमक रूप धारण केलं. शेवटच्या 6 ओव्हर्समध्ये CSK ने तब्बल 83 धावा ठोकत सामना पुन्हा जिवंत केला.

साई सुदर्शनचे विजयी अर्धशतक

159 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरातची सुरुवात अत्यंत स्फोटक झाली. सलामीवीर साई सुदर्शनने संयमी पण आक्रमक खेळी करत शानदार अर्धशतक झळकावले आणि साई सुदर्शनच्या 87 धावांच्या जोरावर गुजरातने विजय मिळवला. सुदर्शन व्यतिरिक्त, कर्णधार शुभमन गिलने 33 धावा आणि जोस बटलरने नाबाद 39 धावा केल्या. चेन्नईच्या फिरकी आणि वेगवान गोलंदाजांना चेपॉकच्या खेळपट्टीवर एकही विकेट काढणे कठीण झाले होते. गुजरातने केवळ 2 गडी गमावून हे लक्ष्य सहज गाठले.

गुणतालिकेत मोठा बदल

या विजयाचा सर्वात मोठा फायदा गुजरात टायटन्सला झाला आहे. गुजरात टायटन्सने 8 सामन्यांत 4 विजय आणि 4 पराभवांसह 8 गुण मिळवून सातव्या क्रमांकावरून थेट पाचव्या स्थानावर झेप घेतली आहे. या पराभवामुळे चेन्नई सुपर किंग्सला मोठा धक्का बसला असून त्यांच्या प्ले-ऑफच्या गणितावर टांगती तलवार निर्माण झाली आहे. गुजरातचा पुढील सामना 30 एप्रिल रोजी अहमदाबादमध्ये आरसीबीविरुद्ध होईल. सीएसकेचा सामना 2 मे रोजी चेपॉकमध्ये मुंबई इंडियन्सशी होईल.

हे ही वाचा –

Team India 3 Future Openers : टीम इंडियाला मिळाले 3 नवे ‘डेंजरस’ ओपनर्स; BCCIच्या निवड समितीची झोप उडाली; आता दुर्लक्ष करणं अशक्य, जुन्या दिग्गजांचं काय होणार?

आणखी वाचा

Comments are closed.