अकोल्यात पारा 46.9 सेल्सिअस, उष्माघाताने आणखी चौघांचा मृत्यू
राज्यात उष्णतेचा कहर वाढला असून सूर्य अक्षरशः आग ओकतोय. मराठवाडा, विदर्भासह संपूर्ण राज्यात उन्हाचा तडाखा वाढला आहे. दुपारच्या वेळेत रस्ते ओस पडत असून अघोषित संचारबंदी लागली आहे. अकोल्यात या मोसमातील सर्वाधिक म्हणजेच 46.9 अंश सेल्सिअसची नोंद झाली. मुंबईतदेखील तापमान थेट 39 अंशांवर पोहोचले अंगाची अक्षरशः लाहीलाही होत आहे. दरम्यान, उष्माघाताने आज आणखी चौघांचा बळी घेतला.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात तापमानात भयंकर वाढ होताना दिसून येत आहे. विशेषतः अकोल्यातील तापमानात मोठी वाढ झाली. या वाढत्या तापमानामुळे अकोला हे जगातील सर्वाधिक तापमान असणाऱ्या शहरांपैकी एक ठरत आहे. जगातील दहा उष्ण शहरात विदर्भातील पाच शहरांचा समावेश आहे. अकोल्यापाठोपाठ अमरावती येथे 46.8, वर्ध्यात 46.4, यवतमाळमध्ये 46 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. त्याखालोखाल नागपूरमध्ये 45.4, चंद्रपुरात 45 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. दिवसागणिक वाढणाऱ्या तापमानामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. जळगाव शहरात तापमान 43 अंशांच्या पुढे गेल्याने महानगरपालिकेने शहरातील प्रमुख चौकांमध्ये टँकरद्वारे पाणी मारण्याची मोहीम राबवली. दरम्यान, नागरिकांनी दुपारच्या वेळी अत्यावश्यक कामांशिवाय बाहेर पडू नये, पुरेसे पाणी प्यावे आणि उष्णतेपासून बचावासाठी आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
उष्माघातामुळे चौघांचा मृत्यू
उष्माघातामुळे राज्यात चौघांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे परभणीत शिवाजी कांबळे (37) यांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. दिवसभर उन्हात फिरल्यानंतर त्यांना चक्कर आली आणि त्यांचा मृत्यू झाला. दुसऱ्या घटनेत एसटी बसमध्ये प्रवास करीत असताना उष्माघातामुळे नागपूरच्या कळमेश्वर तालुक्यातील लक्ष्मण पाटील (65) यांचा मृत्यू झाला. लक्ष्मण पाटील कळमेश्वर तालुक्यातील मांडवी येथील रहिवासी असून ते कळमेश्वर तालुक्याच्या तेलगाव येथून काटोल येथे एसटी बसने जात होते. हिंगोलीत उष्मघाताने अरुणा सांगळे (48) या महिलेचा मृत्यू झाला आहे. ही महिला शेतातील काम उरकून घरी आल्यानंतर तिला उष्माघाताचा त्रास जाणवू लागल्याने तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, पण तिथे उपचाराआधीच तिचा मृत्यू झाला. तसेच लातूर जिह्यातील औसा तालुक्यात 25 वर्षीय महेश इंगोले याचा उष्माघाताने मृत्यू झाला.
Comments are closed.