‘दत्तक वस्ती योजने’चा विस्तार करा; सफाई कामगारांच्या वेतनात वाढ करा! शिवसेनेची महानगरपालिका आयुक्तांकडे मागणी
एसआरए, शिवशाही प्रकल्प आणि म्हाडाच्या इमारतींमध्ये ‘दत्तक वस्ती योजना’ तातडीने लागू करा, यासोबतच या योजनेंतर्गत काम करणाऱ्या सफाई कामगारांच्या मानधनात वाढ करावी, अशी प्रमुख मागणी गोरेगाव प्रभाग क्र. 54 चे नगरसेवक अंकित प्रभू यांनी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांना पत्राद्वारे केली आहे.
प्रभाग क्र. 54 मध्ये अनेक ठिकाणी झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प पूर्ण झाले आहेत. मात्र या प्रकल्पांतर्गत असलेल्या इमारतींना ‘दत्तक वस्ती योजने’चा लाभ मिळत नसल्याने तेथील कचरा व्यवस्थापन आणि स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनला आहे. यामुळे या परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या समस्यांवर मात करण्यासाठी या सर्व गृहनिर्माण संस्था आणि म्हाडाच्या इमारतींमध्ये या योजनेची अंमलबजावणी करणे आवश्यक असल्याचे त्यांनी पत्रात स्पष्ट केले आहे. ‘दत्तक वस्ती योजना’ सुरू केल्यास त्या भागातील अस्वच्छतेचा प्रश्न कायमचा सुटेल, असा विश्वास प्रभू यांनी व्यक्त केला.
सफाई कामगारांना तुटपुंजे मानधन
केवळ स्वच्छतेचाच प्रश्न नाही, तर या योजनेसाठी काम करणाऱ्या सफाई कामगारांच्या आर्थिक परिस्थितीकडेही नगरसेवक प्रभू यांनी लक्ष वेधले आहे. 2011 पासून या कामगारांना दरमहा केवळ 5400 रुपये इतके तुटपुंजे मानधन दिले जात आहे. महागाईच्या काळात ही रक्कम अत्यंत अपुरी असून कामगारांना प्रोत्साहन मिळण्यासाठी वेतन श्रेणीत वाढ करणे ही काळाची गरज आहे, असे प्रभू यांनी म्हटले आहे.
Comments are closed.