आज बंगळुरूही दिल्ली काबीज करणार, दिल्लीत यजमान विजयापासून दूर
सुरुवात दमदार, पण शेवट निराशाजनक, हीच कथा पुन्हा एकदा दिल्ली कॅपिटल्सच्या वाट्याला आलीय. पंजाबविरुद्ध 264 धावांचा एव्हरेस्ट उभा करूनही पराभवाचा घाव बसल्याने दिल्लीचा आत्मविश्वास डळमळीत झाला आहे. आता घरच्या मैदानावर होणाऱ्या सामन्यात विजय मिळवत गाडी पुन्हा रुळावर आणण्याचा निर्धार दिल्लीने केला असला तरी समोर तुफान फॉर्मात धावणारा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) हा मोठा अडथळा उभा आहे. घरच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या दोन्ही सामन्यांत दिल्ली विजयापासून दूरच राहिली आहे. आताही आरसीबीच दिल्ली काबीज करण्यासाठी उत्सुक आहे.
आयपीएलमधील 39 वा सामना अरुण जेटली स्टेडियमवर रंगणार असून गुणतालिकेत आरसीबी सात सामन्यांत 5 विजयांसह दुसऱया स्थानावर, तर दिल्ली 3 विजयांसह सातव्या स्थानावर आहे. आकडेवारीनुसार आरसीबीचे पारडे जड असले तरी घरच्या मैदानावर दिल्लीकडून झुंजार प्रत्युत्तराची अपेक्षा आहे. दिल्ली घरी तीन सामने खेळली असून एकाच सामन्यात त्यांना अद्याप जिंकता आलेले आहे.
राहुल-राणाचा तुफान खेळही पडला अपुरा
पंजाबविरुद्धच्या सामन्यात दिल्लीच्या फलंदाजांनी अक्षरशः धावांचा पाऊस पाडला होता. के. एल. राहुलने 67 चेंडूंत 16 चौकार आणि 9 षटकारांसह नाबाद 152 धावांची वादळी खेळी साकारली, तर नितीश राणाने 91 धावांची तुफानी साथ दिली. पण गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणातील ढिसाळ कामगिरीमुळे हा ‘रन पर्वत’ही निष्फळ ठरला. सलामीवीरांच्या अपयशामुळे संघाचे संतुलन ढासळत असून पथुन निसंका अजूनही प्रभाव पाडण्यात अपयशी ठरला आहे.
कोहलीच्या नेतृत्वाखाली आरसीबीचा आक्रमक मोड
दुसरीकडे, आरसीबीचा आत्मविश्वास आकाशाला भिडलेला आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली फलंदाजांची फौज सध्या धडाकेबाज फॉर्मात आहे. गुजरातविरुद्ध कोहलीने 81 धावांची तुफानी खेळी करत 200 धावांचे लक्ष्य सहज गाठले. देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार आणि टीम डेव्हिड यांच्या आक्रमक फलंदाजीमुळे आरसीबीची मधली फळी भक्कम झाली आहे. त्यामुळे दिल्लीच्या गोलंदाजांसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे.
राहुल विरुद्ध हेझलवूड ः सामन्याचा ‘टर्निंग पॉइंट’
दिल्लीसाठी आशेचा किरण म्हणजे के. एल. राहुलचा तुफानी फॉर्म. सात डावांत 357 धावा करत त्याने संघाचा कणा मजबूत केला आहे. डाव सावरत आणि वेग वाढवत खेळण्याची त्याची क्षमता दिल्लीसाठी निर्णायक ठरू शकते. तर आरसीबीकडून जोश हेझलवूड ‘जॉश द बॉस’ ठरण्याची चिन्हे आहेत. अचूक टप्पा, उसळी आणि महत्त्वाच्या क्षणी विकेट घेण्याची कला यामुळे तो दिल्लीच्या फलंदाजांसाठी घातक ठरू शकतो. त्याला भुवनेश्वर कुमारची साथ मिळाल्यास दिल्लीची फलंदाजी पुन्हा एकदा कोलमडू शकते.
निर्णायक लढत; कोण मारणार बाजी?
एकूणच, अरुण जेटली स्टेडियमवर उद्या रंगणारा हा सामना म्हणजे जणू प्रतिष्ठेची लढाईच ठरणार आहे. दिल्लीला विजयाची भूक भागवायची आहे, तर आरसीबीला वर्चस्व कायम ठेवायचे आहे. आता पाहायचे एवढेच, दिल्ली पुनरागमन करते की कोहलीची सेना पुन्हा एकदा दिल्ली जिंकते!
Comments are closed.