IPL 2026 – हात पकडला, जवळ ओढलं… महिला फॅन्सने अचानक असं काही केलं की अभिषेक शर्माही डचकला
सनरायझर्स संघाचा धडाकेबाज सलामीवीर खेळाडू अभिषेक शर्मा हा सध्या तुफान फॉर्मात आहे. आयपीएलमध्ये त्याच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडत आहे. मात्र यावेळी तो मैदानावरील कामगिरीमुळे नाही तर एका वेगळ्याच घटनेमुळे चर्चेत आला आहे. जयपूरमध्ये एका महिला चाहतीने हॉटेलमध्ये येताना अभिषेक शर्मा याचा हात पकडला आणि त्याला जवळ ओढण्याचा प्रयत्न केला. अचानक घडलेल्या या कृतीमुळे क्षणभर अभिषेक शर्माही गोंधळून गेला. सुरक्षारक्षकांनी महिला चाहतीच्या तावडीतून कशीबशी त्याची सुटका केली. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. यानंतर संबंधित महिलेवर नेटकऱ्यांनी कडाडून टीका केली होती. यावर आता सदर महिलेनेही स्पष्टीकरण देत माफी मागितली आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये अभिषेक शर्मा हॉटेलमध्ये चाहत्यांच्या गर्दीतून जात असताना दिसतोय. यावेळी हिमशिखा त्रिपाठी नावाच्या एका महिलेने अचानक अभिषेकचा हात पकडला आणि त्याला स्वत:कडे ओढण्याचा प्रयत्न केला. या अनपेक्षित प्रकारामुळे अभिषेक गोंधळून गेला. सुरक्षा रक्षकांनी तत्काळ हस्तक्षेप करत अभिषेकला तिथून सुरक्षित बाहेर काढले. हिमशिखाने हा व्हिडिओ स्वत:च्या इंस्टाग्रामवर शेअर केला होता. मुलींना, तुमचे दाजी प्रेमाने ऐकत नव्हते, म्हणून मी काहीतरी केले, असे कॅप्शनही तिने दिले होते. यामुळे नेटकऱ्यांचा पारा चढला आणि त्यांनी हिमशिखाचा पानउतारा केला.
ट्रोलधाड पडल्याने हिमशिखा हिने लांबलचक पोस्ट लिहून स्पष्टीकरण दिले आहे. अभिषेक शर्मा तिथे येणार असल्याचे समजताच मी त्याला भेटायला गेले होते. मी त्याची खूप जुनी चाहती आहे. मला फक्त त्याच्याशी हस्तांदोलन करायचे होते. पण तिथे प्रचंड गर्दी होती. त्या गडबडीत आणि गर्दीत चुकून माझ्याकडून त्याचा हात ओढला गेला. तो क्षण माझ्यासाठी खूप खास होता, म्हणून मी व्हिडिओ पोस्ट केला. पण त्याचा असा चुकीचा अर्थ काढला जाईल किंवा तो इतका व्हायरल होईल असे मला वाटले नव्हते.
माझा हेतू चुकीचा नव्हता. या घटनेमुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी मनापासून माफी मागते, असे म्हणत हिमशिखाने या वादावर पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे. तिने आपल्या इंस्टाग्राम पोस्टवरील कमेंट सेक्शन बंद केले आहे.
Comments are closed.