युझवेंद्र चहल ओपनिंगला येणार? पंजाब किंग्जची मालकीण प्रीती झिंटाची प्रतिक्रिया व्हायरल

आयपीएल २०२६ मध्ये पंजाब किंग्जचा संघ भलताच फॉर्ममध्ये आहे. संघाने आतापर्यंत या हंगामात एकही सामना गमावला नाही. यामुळे पीबीकेएस आयपीएल १९ व्या हंगामाचा एकमेव अपराजित संघ ठरला आहे. त्यांनी सहा सामने जिंकले असून एक सामना रद्द झाल्याने त्यांचे १३ गुण झाले आहेत. मागील पात्रता ट्रेंडनुसार प्लेऑफसाठी पात्र होण्यास संघाना १६ गुणांची आवश्यकता असते, यामुळे पीबीकेएसने आता केवळ दोन सामने जिंकले तर ते प्लेऑफमध्ये पोहोचतील. संघाच्या विलक्षण कामगिरीमुळे ड्रेसिंग रुमचे वातावरण आनंदी आहे.

या आनंदी वातावरणात संघाचा फिरकीपटू युझवेंद्र चहलने सह-मालक प्रीती झिंटाकडे एक मजेशीर विनंती केली आहे. त्याने एक्सवर प्रीती यांना विचारले, “मॅम, एका सामन्यामध्ये ओपन बॅटिंग करायला मिळालं तर?”

चहलच्या या प्रश्नावर प्रीती उत्तरल्या, “नक्कीच, युझी. तुझ्यासाठी काहीही. आयपीएल संपू दे, त्यानंतर तुला जो आवडेल तो सामना मला खात्री आहे की तेव्हा प्रभ आणि प्रियांशला काही हरकत नसेल???”

पीबीकेएसने आपल्या मागील सामन्यात आयपीएलच्या इतिहासात विक्रमी लक्ष्याचा पाठलाग केला. शनिवारी (२५ एप्रिल) दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या त्या सामन्यात पीबीकेएसने २६५ धावांचे लक्ष्य पार करत सामना ६ विकेट्सने जिंकला होता. या हंगामात त्यांचे सलामीवीर प्रियांश आर्य आणि प्रभसिमरन सिंग सातत्याने संघाला उत्तम सुरूवात करून देत आहेत. डीसीविरुद्धही दोघांनी १२६ (४१) धावांची भागीदारी केली होती.

या सामन्यात डीसीकडून केएल राहुलने नाबाद १५२ धावांची खेळी केली होती. त्याच्या या जबरदस्त खेळीमुळे दिल्लीने २० षटकात२ विकेट्स गमावत २६४ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात पीबीकेएसने आक्रमक सुरूवात केली. प्रियांश ७३ धावा आणि प्रभसिमनरने ७६ धावा केल्या. यामध्ये डीसीने ढिसाळ क्षेत्ररक्षणाने सामना गमावला, असे म्हणता येईल. कारण पीबीकेएसचा कर्णधार श्रेयस अय्यरला दोनदा जीवनदान मिळाले. त्याने ३६ चेंडूत नाबाद ७१ धावा केल्या.
आयपीएलच्या इतिहासात सर्वात मोठ्या यशस्वी धावसंख्येचा पाठलाग करण्याचा विक्रम आता पीबीकेएसच्या नावावर आहे. आधीचाही विक्रम त्यांच्याच नावावर होता. त्यांनी २०२४ मध्ये केकेआरविरुद्ध २६२ धावांचा पाठलाग केला होता.

Comments are closed.