उजनीतून पाणी सोडले, मात्र बंधाऱ्यातून सोडण्याचे औदार्य दाखविले नाही; गुडघाभर दूषित पाण्यात भाविकांचे स्नान
मोहिनी एकादशीच्या पर्वणीवर चंद्रभागा नदीचे स्नान आणि श्री विठ्ठल रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी लाखो वारकरी भाविक पंढरीत दाखल झालेत. चंद्रभागेचे स्नान आणिक दर्शन विठोबाचे…या संत उक्ती प्रमाणे स्नानासाठी नदीवर गेलेल्या भाविकांची घोर निराशा झाली. पात्रात पुरेसे पाणी नसल्याने, अस्वच्छ आणि दुर्गंधी युक्त पाण्यात भाविकांना आपले स्नान उरकावे लागले. बहुतांश भाविकांनी स्नान न करता हातपाय धुवून समाधान मानले. वास्तविक 23 एप्रिल रोजी उजनी धरणामधून भीमा नदीत पाणी सोडले आहे. हे पाणी पंढरपूरकडे येत असल्याने, पंढरपूर मधील गुरसाळे आणि जुना दगडी पूल बंधाऱ्यातून पाणी सोडून भाविकांच्या स्नानाची प्रशासनाने सोय करणे सहज शक्य होते. मात्र प्रशासनात ताळमेळ नसल्याने भाविकांना गटारगंगेत स्नान उरकावे लागले.
उन्हाचा पारा चाळीशी पार आहे. अशा कडक उन्हात एकादशीची वारी पोहचती करण्यासाठी दोन लाखाहून अधिक वारकऱ्यांनी गर्दी केली आहे. आलेले प्रत्येक वारकरी चंद्रभागा नदीच्या स्नानासाठी आग्रही असतो. पात्रातील पाण्याची परिस्थिती लक्षात घेऊन स्थानिक प्रशासनाने वेळीच नदीची स्वच्छता करुन बंधाऱ्यातून पाणी सोडणे अपेक्षित होते. मात्र हे औदार्य दाखविले नसल्याने, पात्रात साठलेल्या घाण पाण्याच्या गुडघाभर डबक्यात स्नान उरकावे लागले. काळेकुट्ट पाणी, फटके कपडे, पूजेचे साहित्य, शेवाळे अन् दुर्गंधी पाहून अनेकांनी स्नान न करता दूरच दर्शन घेतले तर काहींनी हातपाय धुण्यावर समाधान मानले.
उजनी धरणातून चार दिवसापूर्वी भीमा नदीत पाणी सोडले आहे हे पाणी उद्या परवा पंढरपूर मध्ये पोहचणे अपेक्षित आहे. पुढे हे पाणी सोलापूर कडे जाणार असल्याने महिनाभर हा पाण्याचा प्रवाह पंढरपूर मधून वहात असतो.
जुना पूल आणि गुरसाळे बंधारा हा पंढरपूर व सांगोला शहराच्या पिण्याच्या पाण्यासाठी राखीव आहे. मात्र दोन तीन दिवसांत या बंधाऱ्यात पाणी येणार असल्याने, भाविकांची गैरसोय दूर करण्यासाठी काही प्रमाणात पाणी सोडले असते तर काहीही बिघडले नसते.
खरं तर हे काम नगराध्यक्षा व आमदारांचे आहे प्रशासनावर अंकुश ठेवून भाविकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेणे अपेक्षित आहे. आज झालेल्या गैरसोयीमुळे दुखावलेला भाविक लोकप्रतिनिधी आणि पंढरपूर प्रशासनाच्या नावाने शंख करणार हे मात्र निश्चित आहे. यापुढे असे घडणार नाही यासाठी वेळीच उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.
Comments are closed.