नीतेश राणे यांना कारावासाची सजा, अधिकारी मारहाण प्रकरणात न्यायालयाने ठोठावली शिक्षा

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

कणकवली येथे राष्ट्रीय महामार्गाचे काम पाहणाऱ्या अभियंत्यावर चिखलफेक करून मारहाण करण्याचे प्रकरण सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या चांगलेच अंगलट आले आहे. जिल्हा सत्र न्यायालयाने या प्रकरणात नितेश राणे यांना एक महिना कारावासाची आणि एक लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे आणि दुरवस्थेसाठी अभियंता प्रकाश शेंडेकर यांना जबाबदार धरत नितेश राणे यांनी चिखलफेक करत आपल्याला मारहाण केल्याची तक्रार शेंडेकर यांनी केली होती. आज या प्रकरणावर जिल्हा सत्र न्यायालयात अंतिम सुनावणी झाली. यावेळी 504 कलमाअंतर्गत दाखल गुह्यात सार्वजनिक ठिकाणी शांततेचा भंग केल्याप्रकरणी न्यायाधीश व्ही.एस. देशमुख यांनी नितेश राणे यांना एक महिन्याचा कारावास व 1 लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. अन्य कलमाअंतर्गत दाखल गुह्यातून नितेश राणे यांना निर्दोष ठरविण्यात आले आहे. या प्रकरणातील अन्य 29 जणांची पुराव्याअभावी निर्देष मुक्तता न्यायालयाने केली आहे.

जिल्हा सत्र न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर आरोपी नितेश राणे यांच्या वकिलांनी शिक्षेला स्थगिती मिळावी याकरिता अर्ज दाखल केला. या निकालाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यासाठी मुदत मागितली आहे. न्यायालयने त्यांची ही मागणी मान्य करत वरच्या न्यायालयात दाद मागण्यासाठी वेळ दिला आहे.

तोपर्यंत शिक्षेला स्थगिती

शांतता भंग करणे आणि त्यासाठी इतरांना प्रवृत्त करणे या आरोपाखाली नितेश राणे यांना दोषी ठरविण्यात आले आहे. या शिक्षेविरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली जाणार असून, तोपर्यंत या शिक्षेला स्थगिती देण्यात आली असल्याची माहिती राणे यांचे वकील अॅड. संग्राम देसाई यांनी दिली.

प्रकरण काय?

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाची पाहणी करण्यासाठी नितेश राणे यांनी 4 जुलै 2019 रोजी कार्यकारी अभियंता प्रकाश शेंडेकर यांना कणकवली येथील गडनदी पुलावर बोलावले होते. यावेळी महामार्गाच्या दुरवस्थेवरून जाब विचारत नितेश राणे यांनी शेंडेकर यांच्या अंगावर चिखल ओतला. एवढेच नाही तर, त्यांना पुलाला बांधून ठेवत दमदाटी करण्यात आली. चिखलातून चालवत नेले. या प्रकरणी शेंडेकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार नितेश राणे यांच्यासह 30 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Comments are closed.