मुंबईकरांना चार दिवस ‘चटक्याचे’, सरकारी सल्ला… शक्यतो घरातच रहा!
मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात सूर्य आग ओकत असल्यामुळे हवामान खात्याकडून पुढील पाच दिवसांसाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईत आज पारा 34.3 तर आर्द्रता 80 टक्के होती. त्यामुळे मुंबईकर घामाघूम आणि कासावीस झाले. पुढील चार दिवस असह्य उकाडा कायम राहणार आहे. दरम्यान, आरोग्य विभागाने अतिउष्माघात ही वैद्यकीय आणीबाणी जाहीर करीत बचावासाठी नियमावली जारी केली आहे.
मुंबई महापालिका प्रशासनाने विशेषतः लहान मुले, वृद्ध आणि आजारी व्यक्तींनी अधिक काळजी घेण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले आहे. सकाळी किंवा दुपारी थेट सूर्यप्रकाश येणाऱ्या खिडक्यांवर पडदे किंवा शेड्स लावावेत. स्थानिक हवामानाचा अंदाज नियमितपणे ऐकून तापमानातील बदलांची माहिती ठेवावी, असेही पालिकेने स्पष्ट केले आहे. शिवाय आपल्या परिसरातील वृद्ध, लहान मुले, आजारी किंवा स्थूल व्यक्ती यांची विशेष काळजी घ्यावी, कारण त्यांना उष्णतेचा अधिक त्रास होऊ शकतो. आपत्कालीन परिस्थितीसाठी प्राथमिक उपचारांचे साहित्य सज्ज ठेवा आणि सावलीसाठी झाडे लावण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.
…या जिह्यांना ऑरेंज अलर्ट
मुंबई उपनगरासह पालघर, ठाणे, रायगड आदी जिह्यांत उष्ण आणि दमट हवामानामुळे उकाडा वाढणार आहे. तर नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड आणि नागपूर जिह्यांत उष्णतेची लाट राहणार असल्याने इथे खबरदारीचा ‘ऑरेंज’ अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर चंद्रपूर आणि यवतमाळ जिह्यात वादळी पाऊस होण्याचा अंदाज आहे.
उत्तरेकडून येणाऱया उष्ण कोरड्या वाऱ्यामुळे पुढील चार ते पाच दिवस मुंबई-महानगर क्षेत्रात तापमान 33 ते 35 अंश सेल्सिअसपर्यंत राहण्याचा अंदाज आहे. शिवाय दमट हवेमुळे उकाडा वाढणार आहे. – सुषमा नायर, आयएमडी, मुंबई
हे करा…
उष्णतेच्या काळात मुलांना किंवा पाळीव प्राण्यांना बंद वाहनात किंवा थेट सूर्यप्रकाशात एकटे सोडू नये. शक्यतो घरातच राहून थेट उन्हात जाणे टाळावे. वातानुकूलन सुविधा नसल्यास घराच्या खालच्या मजल्यावर, सूर्यप्रकाशापासून दूर रहा.
हलका, संतुलित आणि नियमित आहार घ्यावा. तहान लागली नसली तरी भरपूर पाणी पिऊन शरीर हायड्रेट ठेवा. हृदय, मूत्रपिंड, अपस्मार किंवा यकृत विकार असलेल्या व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी, टोपी किंवा कपड्याने चेहरा आणि डोके झाकावे.
Comments are closed.