ठाणे महापालिकेचे उपायुक्त उमेश बिरारी निलंबित; विकासकाला 60 कोटींचा फायदा करून दिला

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

ठाणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाचे उपायुक्त उमेश बिरारी यांना निलंबित करण्यात आले आहे. बिरारी मुंबई उपनगरचे उपविभागीय अधिकारी असताना त्यांनी बोरिवली येथील भूसंपादन प्रकरणात मोठा घोटाळा केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. मोबदला निश्चित करताना जमिनीचे चुकीचे मूल्यांकन करून मूळ मालकाऐवजी विकासकाला तब्बल ६० कोटींचा फायदा करून देण्याचे प्रकरण त्यांना भोवले आहे.

राज्य शासनाकडून प्रतिनियुक्तीवर आलेले उमेश बिरारी हे सध्या ठाणे महापालिकेत अतिक्रमण विभागाचे उपायुक्त आहेत. तत्कालीन उपायुक्त शंकर पाटोळे यांना निलंबित केल्यानंतर अतिक्रमण विभागाचा कारभार बिरारी यांच्यावर सोपवण्यात आला. बिरारी मुंबई उपनगरचे उपविभागीय अधिकारी असताना मौजे बोरिवली येथील भूसंपादन प्रकरणात मोबदला निश्चित करताना जमिनीच्या दरांऐवजी सदनिकांच्या विक्री व्यवहारावरून चुकीचे मूल्यांकन करणे, मूळ मालकाच्या संमतीशिवाय मोबदला रक्कम ६०.३० कोटी थेट विकासकाला वितरित करणे, अशी अनियमितता केल्याचे शासनाच्या निदर्शनास आले.

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात हजेरी

बिरारी यांच्याविरोधात २० जुलै २०२५ रोजी विभागीय चौकशी सुरू करण्यात आली. दरम्यान राज्य शासनाकडून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून त्यांना आता ठाणे पालिका मुख्यालयाऐवजी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात हजेरी लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Comments are closed.