मंगेश कुडाळकर यांच्या आमदारकीला आव्हान, ईव्हीएमसंदर्भात निवडणूक अधिकाऱ्यांचा हायकोर्टात अर्ज; 16 जूनला पुन्हा सुनावणी

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

सत्ता उपभोगणाऱया भाजप, शिंदे गटाच्या आमदारांनी भ्रष्ट मार्गाने निवडणूक जिंकली, असा आरोप करत हायकोर्टात आमदारांच्या निवडीविरोधात विविध याचिका दाखल करण्यात आल्या असून शिंदे गटाचे आमदार मंगेश कुडाळकर यांनीही अनैतिक मार्गाने निवडणूक जिंकली, असा दावा करत शिवसेनेने त्यांच्या निवडीला हायकोर्टात आव्हान दिले आहे. या याचिकेप्रकरणी निवडणूक अधिकाऱयांनी ईव्हीएम संदर्भात आज भूमिका स्पष्ट करत न्यायालयात अर्ज दाखल केला असून हायकोर्टाने या अर्जाची प्रत याचिकाकर्त्यांना देण्याचे आदेश दिले आहेत.

ईव्हीएम घोटाळ्यासह अनैतिक मार्गाने सत्तेत आलेल्या भाजप, शिंदे सरकारच्या कारभारावर चोहोबाजूंनी टीका होत असतानाच भाजप, शिंदे गटाच्या उमेदवारांनी सत्तेचा गैरवापर, भ्रष्टाचार करून विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्याचा आरोप केला जात आहे. कुर्ला विधानसभा मतदार संघाचे शिंदे गटाचे आमदार मंगेश कुडाळकर यांच्या विरोधात शिवसेनेच्या उमेदवार प्रवीणा मोराजकर यांनी याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज सोमवारी न्यायमूर्ती शिवकुमार दिघे यांच्या एकलपीठासमोर सुनावणी झाली. त्या वेळी मोराजकर यांच्या वतीने अॅड. दिलीप साटले यांनी युक्तिवाद केला. सुनावणी वेळी न्यायालयात निवडणूक अधिकाऱयांच्या वतीने सील केलेल्या ईव्हीएम संदर्भात अर्ज सादर केला. त्या वेळी याचिकाकर्त्यांच्या वतीने बाजू मांडणाऱया अॅड. साटले यांनी या अर्जाची प्रत मिळाली नसल्याची माहिती न्यायालयाला दिली. न्यायालयाने याची दखल घेत या अर्जाची प्रत याचिकाकर्त्यांना देण्याचे आदेश दिले व याचिकेवरील सुनावणी 16 जून रोजी निश्चित केली.

Comments are closed.