मोठी बातमी, म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे 2640 घरांसाठी अर्ज सादर करण्यास मुदतवाढ, सोडत कधी?

म्हाडा मुंबई : म्हाडा मुंबई गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळातर्फे जाहीर करण्यात आलेल्या  मुंबईतील विवध गृहनिर्माण प्रकल्पांमधील 2640 सदनिकंच्या विक्रीसाठी आयोजित संगणकीय सोडत प्रणालीमधील ऑनलाईन अर्ज नोंदणी, अर्ज स्वीकृती व अनामत रकमेचा ऑनलाईन भरणा प्रक्रियेला दि. 14मे, 2026 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत मुदतवाढ जाहीर करण्यात आली आहे.मुंबई मंडळातर्फे जाहीर करण्यात आलेल्या सुधारीत वेळापत्रकानुसार इच्छुक अर्जदार दि. 14 मे, 2026 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करू शकतील व 15 मे 2026 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत अनामत रकमेचा ऑनलाईन भरणा करू शकतील. तसेच दि. 15 मे, 2026 रोजी संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत RTGS / NEFT द्वारे अनामत रकमेचा भरणा अर्जदारांना करता येणार आहे.

Mhada Lottery 2026 : सोडत कधी?

म्हाडाकडून दि. 22 मे, 2026  रोजी दुपारी 03.00 वाजता सोडतीसाठी प्राप्त अर्जांची प्रारूप यादी https://housing.mhada.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. दि. 25 मे, 2026 रोजी दुपारी 03.00 वाजेपर्यंत प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यापासून ऑनलाईन दावे-हरकती दाखल करता येणार आहेत. दि. 29 मे, 2026 रोजी दुपारी 03.00 वाजता सोडतीसाठी स्विकृत अर्जांची अंतिम यादी म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे.  सदनिकांच्या वितरणाकरिता प्राप्त अर्जांची संगणकीय सोडत 5 जून, 2026 रोजी जाहीर करण्यात येणार आहे.  सोडतीचे स्थळ मंडळातर्फे लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

मुंबई मंडळातर्फे दि. 30 मार्च, 2026 रोजी मुंबईतील कन्नमवार नगर-विक्रोळी, पत्राचाळ सिद्धार्थ नगर-गोरेगाव, जुने मागाठाणे-बोरीवली, गोराई-बोरीवली, सुभाष नगर-चेंबुर, गांधीनगर- वांद्रे, पंतनगर-घाटकोपर, गिरगाव, वडाळा, कोपरी-पवई, माझगाव, तुंगा पवई, लोकमान्य नगर-दादर, पहाडी गोरेगाव, अँटॉप हिल-वडाळा आदी गृहनिर्माण प्रकल्पांमधील विविध उत्पन्न गटांतील २६४० सदनिकांच्या विक्रीकरिता संगणकीय सोडत जाहीर करण्यात आली.

यामध्ये अत्यल्प उत्पन्न गटासाठी (Economically Weaker Section) 145 सदनिका, अल्प उत्पन्न गटासाठी (Lower Income Group) 858 सदनिका, मध्यम उत्पन्न गटासाठी (Middle Income Group) 1408 सदनिका, उच्च उत्पन्न गटासाठी (Higher Income Group) 229 सदनिका विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

सोडतीत म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे बांधकाम सुरू असलेल्या 1762 सदनिका, विकास नियंत्रण नियमावली 33 (5) अंतर्गत पुनर्विकास प्रकल्पातून विकासकांकडून गृहसाठा (Housing Stock) म्हणून म्हाडाला प्राप्त 371सदनिका, विकास नियंत्रण नियमावली 33 (7) अंतर्गत पुनर्विकास प्रकल्पातून विकासकांकडून गृहसाठा (Housing Stock) म्हणून म्हाडाला प्राप्त 188 सदनिका तसेच मुंबई मंडळाच्या मागील सोडतींमधील विविध कारणांमुळे रिक्त राहिलेल्या विकास नियंत्रण नियमावली 33 (5), 33 (7) व 58 अंतर्गत पुनर्विकास प्रकल्पातून विकासकांकडून गृहसाठा (Housing Stock) म्हणून म्हाडाला प्राप्त व मंडळाच्या विखुरलेल्या 319 सदनिकांचा सोडतीत समावेश आहे.

आणखी वाचा

Comments are closed.