बारामतीचा एक नेता खरातच्या संपर्कात, अजित पवारांच्या तिन्ही घराबाहेर केली काळी पूजा? रोहित पवार म्हणाले…
अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनाला तीन महिने उलटूनही तपासात अपेक्षित प्रगती होत नसल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आज पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला आहे. पुण्यात सीआयडी (CID) कार्यालयाला भेट दिल्यानंतर माध्यमांशी बोलताना रोहित पवार यांनी अजित पवार गटाशी संबंधित एका नेत्यावर आणि भोंदू बाबा अशोक खरात याच्यावर गंभीर संशय व्यक्त केला आहे. ज्यामुळे या प्रकरणात आता काळ्या पूजेचे धक्कादायक वळण समोर आले आहे.
माध्यमांशी संवाद साधताना रोहित पवार म्हणाले की, अजित पवार गटातील बारामतीमधील एक छोटा राजकीय नेता सातत्याने भोंदू बाबा अशोक खरातच्या संपर्कात होता आणि या नेत्याचे इतर मोठ्या नेत्यांशी (अजित पवार गटाच्या) आर्थिक व्यवहारही आहेत. अजित पवारांचे काटेवाडीतील घर, बारामतीचे निवासस्थान आणि मुंबईतील देवगिरी बंगला या तिन्ही ठिकाणांच्या बाहेर, अशा प्रकारच्या पूजा का झाल्या? खराताच्या अकाउंटमध्ये २७, २८ आणि २९ जानेवारीला उलाढाल का वाढली? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
रोहित पवार यांनी एका शेतकऱ्याचा हवाला देत म्हटले आहेत की, २६ किंवा २७ जानेवारीच्या सुमारास जेव्हा एका द्राक्ष बागायतदार शेतकऱ्याने खरातला पवार परिवाराच्या भविष्याबद्दल विचारले, तेव्हा खरातने पुढच्या काही दिवसांत पवार परिवारावर मोठा आघात किंवा अडचण येऊ शकते, असे भाकीत वर्तवले होते. हे सर्व योगायोग नसून यामागे काहीतरी मोठे षडयंत्र असण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.
“आम्ही सीआयडीच्या अधिकाऱ्यांना या सर्व बाबींची गांभीर्याने दखल घेऊन सखोल तपास करण्याची विनंती केली आहे,” असेही रोहित पवार यावेळी म्हणाले. दरम्यान, अजित पवारांच्या निधनानंतर आता जादूटोणा आणि आर्थिक व्यवहारांचे हे आरोप समोर आल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. सीआयडी या नवीन पुराव्यांवर काय पाऊल उचलते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
Comments are closed.