Ratnagiri News – नदीपात्र कोरडे! मिरजोळे-शीळ गावात पाणीटंचाई, शिवसेना आक्रमक
शीळ धरणातील पाणीसाठा कमी होऊन नदीपात्र कोरडे झाल्याने रत्नागिरी तालुक्यातील मिरजोळे-शीळ परिसरातील स्थानिक ग्रामस्थांना दरवर्षी भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. नदीपात्र कोरडे पडल्याने ग्रामस्थांसमोर निर्माण होणारी पाणी टंचाई संपुष्टात आणण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे रत्नागिरी तालुकाप्रमुख मयुरेश्वर पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
पाणी टंचाईच्या गंभीर समस्येची दखल घेत तालुकाप्रमुख मयुरेश्वर पाटील यांनी सिंचन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत प्रत्यक्ष नदीपात्राची पाहणी केली. उद्भवणाऱ्या पाणीटंचाईवर तोडगा काढण्याची मागणी पाटील यांनी यावेळी केली.
तालुकाप्रमुख पाटील यांनी अधिकाऱ्यांसमोर ग्रामस्थांच्या व्यथा मांडल्या. उन्हाळ्याच्या शेवटच्या तीन महिन्यांत गावाचा पाणीपुरवठा कोणत्याही परिस्थितीत खंडित होऊ नये, अशी ठाम भूमिका घेतली. या पाहणी दौऱ्यावेळी मयरेश्वर पाटील यांच्या समवेत पाटबंधारे विभागाचे उपअभियंता श्री. चिरमुरे आणि शाखा अभियंता श्री. धामापूरकर उपस्थित होते. या अधिकाऱ्यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून या समस्येवर लवकरच तांत्रिक बाबी तपासून कायमस्वरूपी तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे. यावेळी उपतालुकाप्रमुख विजय देसाई, मिरजोळे गावचे उपसरपंच अशोक विचारे आणि मिरजोळे-शीळ परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.
Comments are closed.