सुनील कर्जतकर आणि प्रमोद जठारांसह पाचजणांना संधी, विधान परिषदेसाठी भाजप उमेदवार जाहीर
विधान परिषदेच्या नऊ जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीसाठी भाजपने पाच उमेदवारांची यादी जाहीर केली. सुनील कर्जतकर, माधवी नाईक, संजय भेंडे, विवेक कोल्हे आणि माजी आमदार प्रमोद जठार यांच्या नावाचा समावेश आहे. विधानसभा सदस्यांद्वारे विधान परिषदेवर निवडून देण्यात येणाऱ्या नऊ आणि पोटनिवडणुकीच्या एका जागेसाठी 12 मे रोजी निवडणूक होत आहे. विधानसभेतील संख्याबळाचा विचार करता महायुतीला आठ तर महाविकास आघाडीला एक जागा मिळणार आहे. भाजपकडून पाच उमेदवार या निवडणुकीत उतरविण्यात येणार असून त्यासाठी भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने मंगळवारी रात्री पाच उमेदवारांची यादी जाहीर केली. यामध्ये प्रस्थापित बड्या चेहऱ्यांऐवजी संघटनात्मक बांधणीत सक्रिय असलेल्या आणि ग्रामीण भागात पक्षाची पाळेमुळे घट्ट करणाऱ्या सुनील कर्जतकर, संजय भेंडे, माधवी नाईक या नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे.
निवडणुकीसाठी असे असेल मतांचे गणित
विधानसभेतल्या आमदारांची संख्या 288 गुणिले 100 भागिले निवडणूक लागलेल्या 9 जागा आणि अधिक 1 असे मिळून विधान परिषद निवडणुकीसाठी एका उमेदवाराला निवडून येण्यासाठी 29 मतांची गरज आहे. त्यानुसार महाविकास आघाडीकडे 49 संख्याबळ आहे, त्यामुळे त्यांचा एकच उमेदवार सहज निवडून जाईल. महायुतीचे संख्याबळ सध्या 234 इतके असून त्यांचे सहज 8 उमेदवार विधान परिषदेवर निवडून जातील.
राणे आणि कंपनीला भाजपचा चेकमेट
कोकणातील महत्त्वाचे नेते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रमोद जठार यांना विधान परिषदेवर संधी देऊन त्यांचे राजकीय पुनर्वसन करताना राणे आणि कंपनीला भाजपने चेकमेट दिला आहे. जठार यांच्या माध्यमातून कोकण किनारपट्टीवर पक्षाची पकड मजबूत करण्याचा प्रयत्न आहे.
पोटनिवडणुकीसाठी प्रज्ञा सातव
कॉँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश करताना दिलेल्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या पोटनिवडणुकीच्या जागेवर अपेक्षेप्रमाणे प्रज्ञा सातव यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
विखे पिता-पुत्रांना काटशह
कोपरगावमधील कोल्हे घराण्याचे वारसदार आणि माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे चिरंजीव विवेक कोल्हे यांना विधान परिषदेवर पाठवण्याचा निर्णय घेऊन अहिल्यानगरच्या राजकारणात विखे-पाटील पिता-पुत्रांना काटशह दिल्याचे मानले जात आहे.
n विधानसभेतील संख्याबळानुसार नऊ जागांपैकी भाजपच्या वाट्याला पाच, शिंदे गट आणि अजित पवार गटाच्या वाट्याला एक जागा येणार आहे. तर महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांना मिळून एक जागा मिळणार आहे.
Comments are closed.