संगमेश्वर धामणीतील ‘रक्तदूत’ गजानन नार्वेकर यांनी 112 वेळा रक्तदान करून हजारो रुग्णांना दिले जीवनदान
संगमेश्वर येथील तरुण गजानन रमेश नार्वेकर यांनी रक्तदानाच्या माध्यमातून समाजासमोर प्रेरणादायी आदर्श उभा केला आहे. मुंबईत नोकरी करत असतानाही त्यांनी तब्बल 112 वेळा रक्तदान करून अनेक गरजू रुग्णांना नवजीवन दिले आहे. त्यांच्या या सेवाभावी कार्याची सर्वत्र प्रशंसा होत आहे.
सध्या वय वर्षे 40 असलेले गजानन नार्वेकर हे शासकीय सेवेत कार्यरत आहेत. नोकरीची जबाबदारी सांभाळत असतानाही रात्री-अपरात्री कुठूनही रक्ताची गरज असल्याचा फोन आला, की ते स्वतःच्या खर्चाने तत्काळ संबंधित ठिकाणी पोहोचतात. वेळ, अंतर किंवा परिस्थिती यांचा विचार न करता ते नेहमीच मदतीसाठी धाव घेतात. नार्वेकर यांचा रक्तगट ‘ओ पॉझिटिव्ह’ असून, अनेक आपत्कालीन प्रसंगांमध्ये त्यांनी जीव वाचविण्यात मोलाची भूमिका बजावली आहे. अशाच एका प्रसंगी, अत्यवस्थ रुग्णासाठी तातडीने रक्ताची गरज निर्माण झाली होती. मित्राकडून माहिती मिळताच नार्वेकर यांनी क्षणाचाही विलंब न करता रुग्णालयात धाव घेतली आणि आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून रक्तदान केले. त्यांच्या वेळेवर दिलेल्या मदतीमुळे त्या रुग्णाचे प्राण वाचले.
“एकदा रक्तदान केल्यानंतर साधारण तीन महिन्यांनी पुन्हा रक्तदान करता येते,” अशी माहिती देत नार्वेकर सांगतात की, योग्य अंतर ठेवून केलेले रक्तदान सुरक्षित आणि समाजासाठी अत्यंत उपयुक्त ठरते. त्यांच्या या सातत्यपूर्ण योगदानाबद्दल अनेक स्तरांवर त्यांचा सन्मान झाला असला, तरी ते कोणत्याही प्रसिद्धीपासून दूर राहून निस्वार्थीपणे सेवा करत आहेत. “रक्तदान हे श्रेष्ठदान आहे. आपल्या रक्तामुळे एखाद्याचे प्राण वाचत असतील, तर प्रत्येकाने पुढाकार घेऊन रक्तदान करावे,” असे आवाहन करताना ते म्हणतात, “मी स्वतःला भाग्यवान समजतो की माझ्या रक्तामुळे 112 जणांना जीवनदान मिळाले. यापेक्षा मोठे समाधान दुसरे नाही. जोपर्यंत शक्य आहे, तोपर्यंत मी रक्तदान करत राहणार.”गजानन नार्वेकर यांचे हे कार्य समाजातील इतरांसाठी प्रेरणादायी ठरत असून, त्यांच्या या निस्वार्थ सेवेमुळे ‘रक्तदान चळवळी’ला नवी उभारी मिळत आहे.
Comments are closed.