कबड्डीच्या पंढरीत थराराची वारी; मिडलाईन, युनियन बँक, रेल्वे, नौदलाचे विजय; तामीळनाडू क्लब-डीपीयू पुणे लढत बरोबरीत

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त बंड्या मारुती सेवा मंडळाने आयोजित केलेल्या अखिल हिंदुस्थानी कबड्डी स्पर्धेच्या दुसऱ्या  दिवशी कबड्डीच्या पंढरीत थराराच्या वारीने कबड्डीप्रेमींना मंत्रमुग्ध केले. पहिला दिवस मुंबईच्या संघांनी गाजवला होता, तर दुसरा दिवस रोमहर्षक लढतीने गाजवला. मिडलाईन अ‍ॅकॅडमी, दक्षिण-मध्य रेल्वे, हिंदुस्थानी नौदल, युनियन बँक यांनी दणदणीत विजयाची नोंद केली, तर तामीळनाडू क्लब आणि डीपीयू पुणे यांच्यातील सामना बरोबरीत सुटला.

ना. म. जोशी मार्गावरील श्रमिक जिमखान्यावर प्रो-कबड्डीशी तुलना करणाऱ्या  कबड्डी स्पर्धेने कबड्डीचा थरारक दमही घुमवला. दिवसाची सुरुवातच तामीळनाडू क्लब आणि डीपीयू पुणे यांच्यातील संघर्षाने झाली. तामीळनाडू क्लब 17-20 ने पिछाडीवर होता, मात्र मध्यंतरानंतर दोन्ही संघांनी दमदार खेळ केल्यामुळे सामना 40-40 असा बरोबरीत सुटला. प्रतीक चौधरीला शेवटच्या चढाईत गुण मिळवण्याची गरज होती, पण त्याची चढाई निष्फळ ठरली आणि सामना बरोबरीत संपला. तामीळनाडूच्या  विश्वसालवमने सर्वाधिक 14 गुण टिपले. दुसऱ्या  सामन्यात मिडलाईन आणि ओएनजीसी या सामन्यातील संघर्ष 44-43 अशा अवस्थेत संपला. मिडलाईनच्या हर्ष मिदने 22 गुण मिळवत संघाला शेवटच्या क्षणी विजय मिळवून दिला. मध्यंतराला ओएनजीसीकडे 24-22 अशी आघाडी होती.

एकापेक्षा एक खेळाडूंचा भरणा असलेल्या दक्षिण-मध्य रेल्वेच्या संघाने मुंबई पोस्टलचा 48-31 असा फडशा पाडला. अयान लोचनचा वेगवान खेळ आणि अर्जुन देशवाल, नरेंद्र के.यांच्या साथीने रेल्वेला विजयी सलामीसाठी फारसा संघर्ष करावा लागला नाही. पोस्टलकडून अर्जुन धडसने 16 गुणांची नोंद केली, पण ती अपुरी ठरली. तसेच हिंदुस्थानी नौदलाने तामीळ थलायवाजचा 50-38 असा सहज पराभव केला. थलावायजचा हा सलग पराभव असल्यामुळे त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. दुसरीकडे युनियन बँकेने सलग दुसऱ्या  विजयाची नोंद करताना रेड आर्मीला 51-42 असे नमवले. यूपी योद्धाने डीपीयू पुण्याचा  50-20 असा धुव्वा उडवला.

Comments are closed.